शिक्षणाचे महत्त्व | Shikshnache Mhatav
आपण शिक्षण का घेतो ?शिक्षण नेमके कशासाठी ? हा अनेकांना पडलेला प्रश्न.प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे आहे. कोण म्हणते पोट भरावयाची विद्या म्हणजे शिक्षण.कोण म्हणते आपल्यातील सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण. तर कोण म्हणे कलागुणांचा विकास म्हणजे शिक्षण.थोडक्यात काय तर ज्या दृष्टीने आपण पाहत असतो तो दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करताना दिसत आहे.ही झाली सामान्य लोकांची मते.
शिक्षण नेमके कशासाठी |
shikshn mhnje kaay ?काही मानसतज्ज्ञ माणसाच्या वर्तनाला ज्यामुळे दिशा मिळते त्याला शिक्षण म्हणतात किंवा ज्यातून वर्तन बदल घडतात ती प्रणाली म्हणजे शिक्षण. या अंगाने ते मांडणी करतात.तर समाज अभ्यासक म्हणतात माणसाचा सामाजिक विकास ज्याद्वारे घडतो ते शिक्षण तर विज्ञानवादी म्हणतात ज्यातून संशोधनाला गती मिळते ते खरे शिक्षण. थोडक्यात काय तर अंध व्यक्तीने हत्ती पहावा व ज्याच्या हाती जो भाग हाती लागेल तो म्हणजे हत्ती अशी अवस्था पहायला मिळते. ज्याला कान सापडला तो बोलतो हत्ती सुपासारखा,ज्याला पाय सापडला तो बोलतो हत्ती खांबासारखा.अशीच अवस्था आपली शिक्षण प्रणाली बाबत आहे ही खेदाची बाब आहे.
काही शिक्षक मित्रांना विचारले की शिक्षण म्हणजे काय ? शिक्षणाचे ध्येय काय ? याबबात देखील अजब उत्तरे ऐकायला मिळाली. त्यात त्यांचा दोष मुळीच नाही . कारण का तर ते ज्या शिक्षण प्रणालीतून पुढे गेले त्या अभ्यासक्रमातून त्यांना या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही. काही पालक वर्गाला हा प्रश्न केला तर ते बोलले आमची भविष्यकालीन गुंतवणूक म्हणजे शिक्षण. जरा खोलात जाऊन विचारले तर ते बोलले आमची मुले स्वतःच्या पायावर उभी रहावीत. डॉक्टर ,इंजिनियर,कलेक्टर बनावीत म्हणजे आम्ही आमच्या कर्तव्य व जबाबदारीतून मोकळे. मला वाटले याचे नेमके उत्तर ती चिमुकली मुले देतील की जी त्या व्यवस्थेत आहेत म्हणून मी माझ्या विद्यार्थ्याना हा प्रश्न विचारला. की शिक्षण म्हणजे नेमके काय ? का घेतो आपण शिक्षण? तर त्यांनी देखील वेगवेगळी उत्तरे दिली. कोणी बोलले मला छान नोकरी मिळावी म्हणून मी शिकतोय . कोण बोलले घरचे पाठवतात म्हणून मी शिक्षण घेतोय. तर गावाकडील मुली बोलल्या माझी आई शिकली नाही म्हणून तिला शेतात राबावे लागते. मला ते जमणार नाही मला शहरात जायचे आहे,नोकरी करायची आहे किंवा मला नोकरदार जोडीदार हवाय म्हणून मी शिकतेय .. ही सगळी मत- मतांतरे पाहून मला शिक्षण नेमके कशासाठी या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे किंवा त्याचा शोध घ्यायचा होता.
मी जरा वेगळा विचार करून पहिला की आपण ज्या देशात राहतो ती शिक्षण प्रणाली याबाबत काय उत्तर देते पाहूया ? तर उत्तर मिळाले. शिक्षण ही त्या राष्ट्राची गुंतवणूक आहे. थोडक्यात काय तर या मुलांनी नवनवीन शोध लावावेत,नवीन तंत्रज्ञान विकसित करावे व भारताला एक आर्थिक महासत्ता बनवावे अशी काही उत्तरे मिळाली. यातून मला हवे ते उत्तर मिळालेच नाही . कुणाला डॉक्टर बनवेल, कुणाला शास्त्रज्ञ बनवेल,कुणाला विचारवंत बनवेल हे सगळे झाले पण इतर ९५ टक्के लोकाना या प्रणालीने काय दिले? मग नेमके शिक्षण म्हणजे काय हा प्रश्न तसाच राहून गेला. परत विचारांचा गुंता सुरू झाला नेमके शिक्षण कशासाठी ?
विद्यार्थी,पालक,शिक्षक ,विचारवंत व एकंदरीत पूर्ण शिक्षण प्रणालीला कदाचित हे उत्तर मिळालेलेच नाही. माझ्या मते यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की एखाद्याकडून घडणारे वाईट वर्तन मग तो अभ्यासात कमी असतो तोच चुकीचा वागतो का? व जो जास्त गुण मिळवतो तो गैरवर्तन करत नाही असे आहे का? तर नाही. चुकताना दोघेही दिसतात. एवढेच काय तर या सर्वांमधला महत्वाचा घटक असलेला शिक्षक देखील कधी कधी विचार करायला लावतो.खरे आहे ना?शिक्षकांबद्दलच्या काही बातम्या ऐकून तर मन हेलावते .
जास्त स्पष्ट बोलायला नको नाहीतर विषयांतर होईल. मुद्दा हा आहे शिक्षण नेमके कशासाठी ? तर खूप मागे गेल्यावर म्हणजे अगदी ही शिक्षण नावाची प्रणाली अस्तित्वात नव्हती . माणूस देखील एखाद्या प्राण्यागत नव्हे तर जनावरागत वागत होता. तो काळ आठवा किंवा आपण प्राणी आहोत अशी कल्पना करा. थोडक्यात त्या भूमिकेत जा मग समजेल. सगळीकडे बळी तो कानपिळी असे चित्र असते.चांगले वाईट यातला फरक लक्षात आला नसता.आपण अगदी मोकाट झालो असतो . कदाचित इथे काही उत्तरे मिळताना दिसतात की शिक्षण नेमके कशासाठी? तर चांगली नोकरी देते ते शिक्षण ,राष्ट्रविकास करते ते शिक्षण ,माणसाचा आर्थिक दर्जा ज्यातून सुधारतो ते शिक्षण या सर्वाना शिक्षणाचे अंतिम ध्येय म्हणणे हा वेडेपणा ठरेल. एवढेच काय तर सूर्याला काजवा म्हटल्यागत होईल असे मला वाटते.
शिक्षणातून नेमके अभिप्रेत काय तर या सगळ्या प्रणालीतून उत्तम माणूस बनला पाहिजे. मग तो ज्ञानाच्या कोणत्या टप्प्यावर आहे याला फारशी किंमत नाही. समजा शिक्षणाने परिक्षेतील गुणांपेक्षा नेहमी खरे बोलावे . कोणाची वस्तु चोरू नये तर पडलेली पण घेऊ नये. आपण जो नोकरी,व्यवसाय करतो त्यात लबाडी करू नये,आई वडिलांची सेवा करावी.कोणावर अन्याय करू नये यासारख्या बाबी जर केल्या तर कल्पना करा. चित्र काय असेल एकही आई वडील वृद्धाश्रमात दिसणार नाही. चोर नाहीत म्हटल्यावर पोलीस लागणारच नाहीत. स्वार्थ नाही मग वाद विवाद नसतील.मग न्यायालय कशाला?पण हे अंगवळणी पडणे एवढे सोपे नाही. यासाठी पूर्ण प्रणालीची मांडणी या अंगाने होणे अपेक्षित आहे असे मला वाटते. थोडक्यात काय तर शिक्षण म्हणजे उत्तम माणूस बनवणारी व्यवस्था अशी मांडणी व्हायला हवी. शिक्षणतज्ञ,विचारवंत यांनी याबाबत काम करणे अपेक्षित आहे.
आजही माझ्यापुढे ज्यावेळी एखादा बंडखोर विद्यार्थी समोर येतो ,त्याचे वागणे बोलणे नीट नसते, त्याच्या हातून काही चुकीचे घडते त्यावेळी त्याचा राग मला मुळीच येत नाही, का तर आपल्या शिक्षण प्रणालीने त्याला परीक्षा व गुण यात अडकवले याची चीड येते त्याऐवजी त्याला उत्तम माणूस बनवण्यासाठी प्रयत्न केले असते तर कदाचित त्याला लिहिता वाचता नसते आले तरी चालले असते, पण एक माणूस म्हणून तो कुणाला त्रासदायक ठरला नसता. हे झाले एक उदाहरण अशा अनेक बाबी शक्य झाल्या असत्या. माझ्या या मांडणीतून किमान एवढे जरी झाले तरी या शिक्षणातून मला एक उत्तम माणूस घडवायचा आहे. तो कुणाला त्रास देणार नाही. कल्पना करा असे असते तर आज युक्रेन व रशिया यांच्यात जो नरसंहार सुरू आहे तो दिसला असता का? समजा हे दोन देश नसून दोन व्यक्ती आहेत अशी कल्पना करा. जर माझ्यामुळे कुणाला त्रास होणार नाही ही भूमिका अंगी असती तर कदाचित हे चित्र असे दिसले नसते. वाद होऊ नयेत यासाठी जागतिक शांतता परिषद स्थापन करावी लागली नसती.
एकंदरीत काय तर आजच्या शिक्षण प्रणालीतून मनुष्य हा एक प्राणी आहे हे मान्य करून त्याचे उत्तम माणसात रूपांतर झाले पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हायला हवेत. आजच्या शिक्षण प्रणालीतून परीक्षेतील गुणांपेक्षा माणूस म्हणून तो किती गुणी आहे या बाबी पाहणे गरजेचे आहे . समजा एखादा विद्यार्थी गृहपाठ न करता शाळेत आला व शिक्षकानी त्याला कारण विचारले व तो बोलला गुरुजी आज माझा अभ्यास करण्याचा मूड नव्हता . या प्रसंगात आपली सध्याची शिक्षण प्रणाली बोलेल असे केले तर तुझे भविष्य अंधारमय आहे . पण वरील मांडणीनुसार विचार केला तर तो खरे बोलला या गुणाची दखल घेतली तर तो कधी खोटे बोलणारच नाही . इथे जरी तो उत्तम माणूस बनलेला नाही पण प्रवास त्या दिशेने नक्की सुरू आहे.
थोडक्यात काय तर शिक्षणातून कावेबाजपणा ,ढोंगीपणा जाऊन शाश्वत बदल अपेक्षित आहे व तो व्हायला हवा.विद्यार्थी, पालक,शिक्षक संपूर्ण शिक्षण प्रणाली या अंगाने पुढे जाईल त्यावेळी अवघ्या विश्वात एक चक्र दिसेल जे निसर्गाने लावून दिले आहे. जशी सर्व प्राणी सृष्टी आपापल्या परीने गुण्या गोविंदाने राहतात. जसे की एखादा पोपट पेरू किती गोड लागला तरी दिवस मावळण्यापूर्वी त्याला सोडून आपल्या आश्रय स्थानी जातो. मग माणसाला उत्तम माणूस बनण्याची जाणीव झाल्यावर तो भ्रष्टाचार करेल का? तर नाही. कोणता देश एकमेकांचा राग राग करेल का ? तर उत्तर मिळेल नाही.Shikshn Nemke Kashasathi हे तुम्हाला कळलेच असेल.
चला तर मग एक नवी दृष्टी घेऊन पुढे जाऊया नि या शिक्षण प्रणालीतून उत्तम माणसांची फौज बनवूया . ज्यावेळी हे चित्र असेल त्यावेळी अन्याय ,लबाडी,अत्याचार ,भ्रष्टाचार यासारख्या बाबी इतिहासजमा झालेल्या पहायला मिळतील यात शंकाच नाही. मेरीट पेक्षा माणूस म्हणून तो कुठे आहे ते पाहूया.... आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा .
भारताचे नवे शैक्षणिक धोरण मात्र पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवरूपी ज्ञान यावर भर देताना दिसणार आहे. कायआहे हे नवीन धोरण हे जाणून घेण्यासाठीखालील लिंकवर क्लिक करा.
https://www.dnyanyogi.com/2022/03/new-education-policy-2020.html
खूपच छान वाचनीय असा लेख आहे. यावर मी एकच बोलेल आपल्या भारतात पूर्वी जी शिक्षण पद्धती होती ती यासाठी खूपच उपयुक्त ठरेल कारण यात अभ्यासाबरोबरच ध्यान धारणा, अंगमेहनत, स्वावलंबन अश्या अनेक गोष्टी होत्या.
उत्तर द्याहटवागांधीजींनी अशीच एक शाळा तयार केली होती आणि अनेक मुले त्यातून घडली.
मुलं शाळेमध्ये सहा तास असतात आणि त्यांच्या घरातील वातावरणात घराच्या शेजारील वातावरणात 24 तासा पैकी 18 तास घालवतात यामुळे कौटुंबिक वातावरण आणि आजूबाजूचे वातावरण हे खूप महत्त्वाचे ठरते त्यामुळे जोपर्यंत या सर्व बाबी घडत नाही तोपर्यंत मुलांमध्ये मूलतः अशा विचारांचे रुजवणूक करणे कठीण आहे अजून एक महत्त्वाची बाब भारत देशाला स्वतंत्र होऊन आज 75 वर्षे होत आली तरीदेखील आणि एकविसावे शतक सुरू होऊन संगणक युग येऊन देखील 100% मुलांना शिक्षण मिळत नाही एवढेच काय शिक्षण हक्क कायदा आला तरीदेखील शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचू शकलेले नाही अशी परिस्थिती असल्यामुळे मूलतः बदल होणे खूप कठीण आहे
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान लेख
उत्तर द्याहटवाखूप छान सर👌👌👌
उत्तर द्याहटवा