दहावी फेल ते नोयडा | Dahavi Fail Te Noida
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! मी रणजीत महादेव पोकळे,कम्प्युटर इंजिनियर .माझे मित्र प्रशांत शिपकुले सर यांना माझा शैक्षणिक प्रवास सर्वानी प्रेरणा घ्यावा असा वाटतोय, म्हणून त्यांनी विनंती केली की आमच्या dnyanyogi.com च्या माध्यमातून दहावी नापास ते आज कम्प्युटर इंजिनियर किवा दहावी फेल ते नोयडा येथे छान नोकरी हा प्रवास आणि सध्या किमान महिना २ लाख पगार देणारी नोकरी .हा प्रेरणादायी प्रवास सांगून आमच्या विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल बनावे या त्यांच्या विनंतीचा आदर म्हणून मी माझा हा संघर्षमयी प्रवास मांडतोय.
दहावी फेल ते नोयडा |
मी रणजीत सध्या पुण्यात कम्प्युटर इंजिनियर म्हणून नोकरीला आहे.सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यामध्ये सोमंथळी या एका छोट्याशा गावात माझा जन्म झाला.६ जुलै १९९२ हा माझा जन्मदिवस. तुम्ही म्हणाल अभ्यासाचे बोला हे काय सांगताय ? आम्हाला.अरे हो सांगतो मित्रांनो ! पण जरा पार्श्वभूमी सांगतो नि मग आहेच की अभ्यासाचे.माझा जन्म झाला त्या दिवशी घरातील आजी ,आजोबा,वडील चुलते सगळेच खूप खुश होते पण काय माहीत त्या दिवशी कुठे तरी अशी काय तरी घटना घडली होती, माहीत नाही पण त्या दिवशी आमचा पूर्ण फलटण तालुका त्या घटनेच्या निषेधात बंद होता.सर्व दुकाने,भाजी मंडई,किराणा दुकाने,जनरल स्टोअर सगळे काही बंद.रस्ते निर्जन जसे काय हे सगळे माझ्या जन्माचा निषेध करण्यासाठी सुरूआहे असे काहीसे.माझी आजी मला सांगते की तुझी आई तुझ्यावेळी बाळंत झाली आणि तिला प्रचंड अशक्तपणा आला. डॉक्टरांनी सांगितले यांना तात्काळ चहा आणि बिस्किट खायला द्या त्यातून त्यांचा वीकनेस कमी होईल.माझ्या आजोबांनी खूप वणवण करून कुठून तरी ती सोय केली.माझा जन्म झाला खरा पण माझी आई मरणाच्या दारात. मला वाटते माझ्या जन्मापासूनच माझी Unluky Journy ची सुरुवात झाली की काय? असो ते संकट टळले. मी लहानाचा मोठा होत गेलो.आता शाळेत जाण्याचे वय झाले.
मला आठवते मी ५ वर्षाचा असेन आमचे आजोबा कोंडीराम पोकळे आमच्या तालुक्यातील एक उमदे व्यक्तिमत्त्व. सुरुवातीला शेतीत रमणारे परंतु नंतर राजकारणात आवड निर्माण झाली. गावातील ग्रामपंचायत , सहकारी सोसायटी असो की सहकार कारखाना निवडणुका असो त्यांचा एक वेगळाच दरारा होता.सहकारी साखर कारखान्यात संचालक असल्या कारणाने त्यांची आमच्या पंच कृषीत एक कुशल ,वजनदार राजकारणी ,सच्चा कार्यकर्ता ते आज फलटण तालुक्यातील मोठा पुढारी म्हणून ओळख होती.सांगण्याचा मुदा हा की इतक्या गडगंज श्रीमंत घराण्यात माझा जन्म झाला. आमचे आजोबाना प्रेमाने आम्ही सगळे त्यांना दादा म्हणयचो. ते जेमतेम ४ थी पास. पण अनुभवाच्या शाळेत डीग्री घेतलेल्या माणसाला देखील मागे पाडतील असे आमचे दादा.ते मला लहानपणापासून कायम म्हणायचे. बाळा शिक्षण नीट घे. का तर शिक्षण केवळ नोकरी मिळावी म्हणून नाही तर चार माणसात कसे वागावे ? कसे बोलावे ?याचे भान देते.शिक्षण आपली किमत वाढवते. कुठे तरी दादाना त्यांचे शिक्षण कमी याची खंत ते माझ्या कडून पूर्ण करून घेत असावेत. नंतर मला समज आल्यावर दादा शिक्षनाविषयी दक्ष का ? तर माझे वडील आणि चुलते यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा मिळाल्या पण त्या मानाने ते खूप काही शिकले नाहीत म्हणूनच की काय दादा माझ्या शिक्षणविषयी दक्ष होते. त्यांनी मला आमच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत न टाकता आमच्या तालुक्याला असणाऱ्या एका नामांकित शाळेत टाकले.पण म्हणतात ना आडात असेल तर पोहऱ्यात येणार अशीच काय ती माझी अवस्था. मी अभ्यासात खूप हुशार ही नाही आणि खूप ढ गोळाही नाही अशी मधली अवस्था.म्हणजे सोप्या भाषेत जेमतेम होतो.
माझ्या वडिलांचे मावस भाऊ पांडू नाना आमच्याकडेच राहत होते.माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी तेच मला सोडायला आले. मी त्यांना म्हणयचो माझे सगळे मित्र गावातच शिकतात मला पण त्यांच्या सोबत शिकायचे आहे. इतक्या लांब फलटणला का आणलेय ?ते मला समजवायचे गावच्या शाळेपेक्षा ही शाळा छान आहे. इथे सगळ्या सोयी सुविधा आहेत.पण मला ते पटत नव्हते नाना मला शाळेच्या गेटवर सोडून निघाले मी त्यांचा हात घट्ट पकडून रडू लागलो, कारण तो माझा शाळेचा पहिला दिवस होता.कधी आजोबा, तर बऱ्याचदा नानाच शाळेत सोडायला व न्यायला येत असत.वर्षामगून वर्षे जात होती काही दिवसांनी माझा लहान भाऊ चण्या पण त्याच शाळेत शिकायला आला.सातवी पर्यन्त मी तिथेच शिक्षण घेतले. सुरुवातीला मला न आवडणारी शाळा मला आवडू लागली.
दररोज शाळेत जायचे नि शाळेतून घरी आलो की जरा आराम करायचा संध्याकाळ झाली की आमच्या बंगल्यापुढेच आजोबानी एक तालिम बनवली होती. त्याना कुस्तीचे प्रचंड वेड. माझ्या लहान चुलत्याना म्हणजे बाळू काकांना देखील कुस्ती प्रशिक्षण घेण्यासाठी सांगलीला पाठवले होते.आमचे बाळू काका आम्हाला कुस्तीतील डाव /टिप्स सांगायचे.दादा नेहमी बोलायचे कुस्ती नि अभ्यास कशात कमी पडायचे नाही गडयानो ! माझी ऊंची ऊंची ६ फुट १ इंच असल्याने मी लहानपनापासूनच इतर मुलांच्या तुलनेत धिप्पाड वाटत होतो. आमच्या दादांना भारी याचा गर्व.माझ्या मित्रांना घरातल्या सर्वांना म्हणायचे " हा पोरगा महाराष्ट्र केसरी बनवायचाय मला." हे ऐकून मला आणखीन स्फुरण यायचे. मी माझ्यापेक्षा मोठ्या पैलवणाशी कुस्ती करून त्यांना चारी मुंड्या चित करायचो. एकीकडे अभ्यासात उजेड मात्र लाल मातीत म्हणजे कुस्तीत मात्र मी कस लावत होतो.मी काही वर्षे कुस्त्या आवडीने केल्या पण पुढे मात्र तो नाद कमी झाला. समज वाढली तस जीवन बदलू लागले.
चला पुन्हा मूळ विषयावर येऊया. सातवी पास झालो कसा बसा नि पुढील शिक्षणासाठी हायस्कूल ला प्रवेश घेतला. ते तालुक्यातील नामांकित हायस्कूल.कमी गुण म्हणून प्रवेश मिळत नव्हता पण आमच्या दादानी त्यांच्या ओळखीने प्रवेश घेऊन दिला खरंपरंतु अभ्यास तर मलाच करायचा होता ना ?माझे गुण पाहून त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला अ,ब,क,ड,इ,फ,ग या वर्गात न बसवता अगदी शेवटच्या म्हणजे लंगड्या घोड्यावर पैसा लावावा तश्या ह तुकडीत बसवले. या वर्गात ज्याचे नशीब बलवत्तर असेल तोच दहावी पास होऊ शकतो असा वर्ग मला तो ही वशीला लाऊन मला मिळाला. ह तुकडीत म्हणजे त्या शाळेतील 'सगळ्यात गेलला वर्ग' अशा तुकडीत मी दाखल झालो.मी शाळेत घरचे लावत आहेत म्हणू जात होतो असेच काहीसे .गावातील माझ्या मित्राना वाटायचे रणजीत किती मोठ्या हायस्कूल मध्ये शिकतोय पण माझ मलाच माहीत. दिव्या खाली किती अंधार आहे ते.हे का सांगतोय ? तर तुम्ही कोणत्या शाळेत शिकता, किती महागडे शिक्षण घेता याला अर्थ नाही. तुम्ही किती मन लावून शिकता. किती मन लावून अभ्यास करता हे महत्वाचे असते.जसे की मी करत होतो हसू आले ना. खरे आहे.मी मन लाऊन अभ्यास न केल्याने मला किती अडचणी आल्या ते पुढे मी सांगेनच.
माझे आजोबा माझा अभ्यास कसा सुरूआहे. हे माझ्या आईला कायम विचारत असत.दादांचा दरारा भारी.माझे वडील,चुलते व नाना दादांच्या मोटर सायकलचा आवाज जरी आला तरी सगळे चिडी चूप. घर काय घराच्या भिंती पण धीर गंभीर असे सगळे चित्र.दादा आले नि मी घरी असलो की त्यांना पाण्याचा तांब्या नेऊन द्यायचे काम माझे असायचे. मी तांब्या घेऊन आत गेलो की दादा आपले कपडे बदले पर्यन्त तांब्या टेबलवर ठेऊन मी गायब.कधी कधी ते मला आवाज देऊन जवळ बोलवायचे. नि दम देऊन कसा चालू आहे अभ्यास ? उद्या मी येतोय तुझ्या शाळेत तुला सोडायला नि आल्यावर सरांना भेटणार आहे असे बोलताच मी पंमचेर होऊन जायचो.पण दादा फक्त दम देत. का तर मी मनापासून अभ्यास करावा म्हणून पण हे नंतर मला कळू लागले. आमचे दादा खर हेवा वाटावा असा माणूस .माझी आई माझा व माझ्या माझ्या भावाचा अभ्यास घ्यायची अभ्यास घेताना ती कायम सांगायची मी शाळेत असताना वर्गात कायम पहिली यायची नि काय तुम्ही .आमचा अभ्यास पाहून ती कायम नाराज असायची. मी जरा बरा पण माझा लहान भाऊ ज्याला आम्ही प्रेमाने चण्या म्हणतो तो तर महा खतरनाक होता. म्हणजे माझ्यापेक्षा ढब्बू गोल.
मी नववी बऱ्यापैकी चांगल्या गुणांनी पास झालो. नि दहावीच्या वर्गात गेलो. माझ्या आजोबांनी मला १० वीचे वर्ष म्हणून खाजगी क्लासेस लावले. ज्या क्लासेसला मी जायचो त्या गाढवे मॅडम आमच्या दादांच्या परिचयाच्या होत्या. त्यांनी मॅडमला बजाऊन ठेवले होते , काही करा ,वाटेल ते करा वेळ पडली धरून झोडा पण पोरगा पास नाही चांगल्या गुणांनी पास झाला पाहिजे कारण का तर याला पुढे कम्प्युटर इंजिनियर करायचं आहे. ते मॅडमला सांगत होते .आमच्या एका मित्राचा मुलगा सध्या अमेरिकेत सॉफ्टवेअर इनजिनियर आहे. चांगला पगार आहे रणजीतला तेच शिक्षण द्यायचे आहे. मी फक्त कान देऊन ऐकत होतो.मलाही वाटत होते की झालो तर कम्प्युटर इंजिनियर व्हायचे. पण अभी दिल्ली दूर थी असे सगळे.मी क्लासेसला वगेरे जाऊ लागलो. मन लाऊन अभ्यास करू लागलो. क्लासेसच्या मॅडम मुळे गणित,विज्ञान विषय आवडीचे झाले.दहावीचे वर्ष म्हणून मी देखील जरा जास्त दक्ष झालो व मन लाऊन अभ्यास करू लागलो.
मला आजही आठवत आहे तो दिवस की आमची दहावीची प्रथम सत्र परीक्षा झाली होती नि आम्हाला विज्ञान भाग २ विषय शिकवणारे शिंदे सर आम्हाला किती गुण पडले हे सांगत होते व उत्तरपत्रिका पहायला देत होते. वर्गातील सर्वांच्या उत्तरपत्रिका दिल्या गेल्या.पण माझे नाव सरांनी घेतले नाही मला भीती वाटू लागली माझे नाव का घेतले नाही. शिंदे सरांच्या हातात केवळ एकच उत्तरपत्रिका होती आणि त्यांनी सर्वात शेवटी रणजीत पोकळे असे नाव घेताच मी घबरत घबरत उठलो पाय लटपट करत होते. मला काहीच समजत नव्हते.शिंदे सर बोलू लागले "मी आपल्या शाळेत अ तुकडीपासून ह तुकडीपर्यंत सर्वांना विज्ञान २ विषय शिकवतो. या विज्ञान भाग २ या विषयात रणजीतला ५० पैकी ४९ गुण मिळाले आहेत. माझ्यासाठी तो या वर्गात पहिला नाही तर आज या शाळेत पहिला आहे.ह तुकडीत असून तो प्रचंड मेहनत घेत आहे"सरांनी केलेली ही स्तुती ऐकून माझ्या तर काळजाचे ठोकेच वाढले. मला कौतुक आवडायचे ; पण कोणी करत नव्हते, कारण का तर तसे माझ्याकडे विशेष असे काहीच नव्हते. आता मात्र ठरवले अजून नेटाने अभ्यास करून दहावीला चांगले गुण मिळवायचे.मी तासनतास अभ्यास करू लागलो.मराठी,गणित,विज्ञान हे माझे आवडीचे विषय झाले.अभ्यास करता करता माझ्या दहावीच्या परीक्षा संपल्या. परीक्षा संपल्यावर सुट्टीत दिवसभर मित्रांसोबत खेळायला जायचो. संध्याकाळी कुस्त्या व नंतर मित्रांबरोबर पुढे कोण काय शिकणार ?अश्या सगळ्या गप्पा झोडत बसायचो .सुट्टीचा एप्रिल, मे कसा गेला ते कळले नाही.
. अखेर जून निकालाचा महिना उजाडला.मी सकाळी देवाच्या पाया पडून माझी सायकल घेतली. पास तर होणार याची खात्री म्हणून पेडे घ्यायचे म्हणून आजीकडून ५० रुपये घेतले.उत्सुकता होती किती टक्के गुण मिळतील याची.मी अतिशय आनंदी होतो.आम्ही मित्र मंडळी वर्गात बसलो होतो. आमचे वर्ग शिक्षक टी. एन. शिंदे सर वर्गात आले. रोल नंबर प्रमाणे निकाल वाटू लागले.मुले निकाल पाहत होती त्यातील कोणी नापास म्हणून उदास तर पास होणारी आनंदात एकमेकांचे हातात हात घेऊन कौतुक करत होती. माझा २९ रोल नंबर आला. मी माझा निकाल हातात घेतला.आमचे वर्ग शिक्षक बोलले पोकळे bad luk. मी हसलो. मला वाटले कमी टक्के मिळाले असतील म्हणून सर असे बोलत असतील. मी मात्र हसत हसत निकाल घेतला. नि माझी टक्केवारी पहिली तर जवळपास मला ६४ टक्के गुण मिळालेत हे पाहून मी प्रचंड खुश झालो. मराठीत ६२,गणितात तब्बल ११६ गुण ,विज्ञानात तर १०० पैकी ८५ गुण असे वाटले इथेच नाचावे.पण निकाल बारकाईने पाहताना result section मध्ये FAIL लिहिले होते.माझ्या डोळ्यापुढे अंधार येऊ लागला,कानात गुंग असा आवाज येऊ लागला छाती भरून आली काळीज प्रचंड घाबरले असावे आतून त्याचे ठोके प्रचंड वाढले.काही क्षणापूर्वी इतका आंनदी असणारा मी कोसळून गेलो.मला चक्कर येते की काय असू वाटू लागले. मी विषय निहाय गुण पाहिले तर इंग्रजी विषयात मला केवळ १९च गुण मिळाल्याने मी नापास झालो होतो. पायाखालची जमीन सरकणे हा वाक्प्रचार ऐकला होता. तो आज पहिल्यांदा अनुभवत होतो .आजीकडून पेढे घ्यायला घेतलेले ५० रुपये पाहून अजूनच रडू आले पण वर्गातील सर्व मुले , शिक्षक म्हणून मी ते रडू आवरले.
मला गणित शिकवणाऱ्या पी. वी. पवार सरांनी मला हात करून वर्गा बाहेर बोलावले ,मला वाटले माझे गुण पाहण्यासाठी असेल कदाचित कारण मी त्यांचा आवडता विद्यार्थी होतो. त्यांचा मुलगा माझ्याच क्लासेसमध्ये शिकत होता त्यांच्या मुलापेक्षा मला गणितात जास्त गुण पडले होते. मी नापास झालोय हे सरांनाआधीच माहीत होते. त्यांनी माझ्या पाठीवर मायेने हात फिरवला व बोलले आपण रिचेकिंग करू वाढतील गुण तू पास होशील. संकटात आधार किती गरजेचा असतो ते त्यावेळी मला कळले.मी थोडा सकारात्मक झालो.चला आपण रिचेकिंग करून पास होऊ शकतो. ही आशा लागली पण झाले उलटेच . माझे १९ चे १७ गुण रीचेकिंग मध्ये आले . हा १७ आकडा जसा माझ्या जीवनात खतरा घेऊन आलाय असे वाटू लागले .पदरी केवळ निराशा.अमाप दुख जे सांगायला शब्दही कमी पडत आहेत मित्रांनो!
निकाल हातात घेतला शाळेच्या बाहेर आलो. मी कुठे चलोय ? काय करतोय? कसले भान नाही . मन म्हटले कमी टक्केवारी असती तरी चालले असते पण नापास व्हायला नको होते. चूक माझीच होती मी कायम इंग्लिश विषयाचा दुसवास / राग राग केला. कारण मला तो विषय आवडत नव्हता .अगदी उद्या इंग्रजी पेपर व मी किती मूर्ख मुलगा. विज्ञान भाग १ चा अभ्यास करत होतो. सांगण्याचा मुद्दा हा की आवडते म्हणून त्याच विषयाचा जास्त अभ्यास करणे किती घातक असते हे मला यातून सूचित करायचे आहे. मित्रांनो मी हात जोडून विंनती करतो तुम्ही अशी चूक करू नका.मी सायकल घेतली घराच्या दिशेने जाताना आज पहिल्यांदा घसा कोरडा पडत होता. एका हॉटेल मध्ये जाऊन पाणी पिलो तरी तहान जाईना. आता घरी गेल्यावर दादांना,आई, वडील,नाना ,काका यांना काय उत्तर देऊ ?मित्राना नापास झालो हे कसे सांगू ? मला खूप वाईट वाटत होते कारण आज मी जीवनातील पहिली लढाई दहावी आज हरलो होतो. डोळ्यात फक्त नि फक्त अश्रु नि एक वेगळीच पोकळी पुढे फक्त काळा कुट्ट अंधार अस काही.
माझे घर जवळ येत होते.माझ्या मित्राच्या आईने मला रस्त्यात हटकले किती टक्के .त्यांचा मुलगाही १०वी ला होता. तो चांगल्या गुणांनी पास झाला होता त्यांना पण खात्री होती की मी पास असेन. पण किती टक्के ही उत्सुकता असावी .मी काही न बोलता त्यांच्या हातात माझा निकाल दिला त्यांनी तो fail शब्द पहिला व निकाल माझ्या हातात दिला. त्या देखील नाराज झाल्या.तिथून दोन मिनिटात मी आमच्या बंगल्या समोर आलो. आजी पायऱ्यांवर बसली होती. मी तिच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागलो नंतर स्वताला सावरले व आवाज कमी केला का तर दादा घरात असतील या भीतीने.योगायोग म्हणजे त्या दिवशी दादा,पप्पा ,बाळू काका व नाना कोणीच घरात नव्हते.मी आमच्या खोलीत बेड वर जाऊन जोरजोरात रडत होतो. माझे रडणे पाहून कोणाची जवळ येण्याची हिम्मत झाली नाही. माझी अडाणी आजी घरात व मला बोलली.,''काय रडतोयस एडया १ तर विषय गेलाय." आईचा उदास चेहरा तर मला पाहवत नव्हता.शाळेत असताना वर्गात पहिली असणारी माझी आई आणि तिचा मुलगा आज दहावी नापास झालाय. याचे तिला किती दुख होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी.आता मला दादा जाम मारणार,पप्पा रागावणार. सगळ्या गावात आमच्या घराची माझ्यामुळे नाचक्की होणार,उलट सुलट चर्चा होणार असे एक न अनेक विचार माझ्या डोक्यात येत होते व डोके अजून जड करत होते. थोड्या वेळाने दादा,वडील,चुलते सर्व आले पण मला कोणी रागावले नाही. नाना माझ्या जवळ आला त्याने मला मिठीत घेतले. जसे काही ती मिठी ऑल इज वेल यासाठीच होती . ते म्हणाले "घाबरू नको आपण रेचेकिंग ला अर्ज करू" मी येतो तुझ्यासोबत उद्या शाळेत. मला जरा धीर आला. पण मला नंतर कळले की त्या दिवशी दादा व घरातील सगळी मंडळी माझ्यावर का चिडली नाहीत ते .आमच्या दादांना कोणी एक शब्द बोलायची हिम्मत करत नव्हते पण आजीने माझ्या निकाला दिवशी त्यांना व माझ्या पप्पाना ते घरात येण्याआधी बजावले होते की "भैय्या खूप रडलाय त्यालाकोणी अजिबात रागावू नका.एक तर विषय गेलाय.अभ्यास करून तो पास होईल." खरच माझी अडाणी आजी शिक्षणातले काही कळत नाही पण तिचे मानसशस्त्र मनोवैज्ञानिकाला लाजवेल असे होते.खर देवानेच माझ्या दुखात भर नको म्हणून आजीला ती बुद्धी दिली असावी. असो.
आता मी दहावी नापास हे लेबल घेऊन वावरत होतो, किमान ऑक्टोबरची परीक्षा होई पर्यन्त तरी. मी अभ्यास करणार पास होणार हे सगळे खरे.पण चुकीला माफी नाही ? असा माझं स्वभाव. का म्हणून मी इंग्लिश चा अभ्यास केला नाही ? तर तो विषय आवडत नव्हता म्हणूनच ना ? मग मी स्वताला शिक्षा म्हणून मला न आवडणाऱ्या बाबी कोणत्या आहेत ?यावर विचार केला व मला समजले की माझा छोटा भाऊ कायम गोट्यात आवडीने गायाणा चारा घालणे ,दूध काढणे ,गायी धुणे अशी कामे करत असतो ; पण मला ते आवडत नव्हते. मग मी माझा मोर्चा गोट्यात वळवला.हे का सांगतोय तर आपली चूक मान्य करायला शिकले तरच प्रगती होते. इंग्लिश विषयासाठी क्लास लावले. क्लासवरून घरी आलो की अभ्यास नि अभ्यास झाला की गोठा असे चक्र सुरू झाले.वस्तीतील मुळे तालमीत येत होती. कुस्त्या खेळत होती पण मला कुस्तीपेक्षा माझ अपयश मला खात होते. मी कुस्ती खेळणे सोडून दिले व अभ्यास एके अभ्यास सुरू झाला. प्रयत्न अंती परमेश्वर.मी ४४ गुण मिळवून इंग्रजी विषय पास झालो.व ज्या रिपीटर मुलांच्या क्लास ला जातो तिथे पहिला आलो हे ही नसे थोडके.
दहावीची परीक्षा तर पास झालो. मला मिळालेली टक्केवारी देखील चांगली होती. मी अभ्यासाच्या राइट ट्रॅक वरती होतो. इंग्रजीत नापास हा घाव माझ्या वर्मी लागला होता, म्हणूनच मी ठरवले की आर्टला न जाता इयत्ता अकरावी विज्ञान ला प्रवेश घ्यायचा. विज्ञान शाखेत प्रवेश घेत असताना मी दहावीला नापास झाल्यामुळे प्रवेशाच्या वेळी अनेक अडचणी आल्या.आमच्या दादांनी थोडे प्रयत्न केले आणि मला प्रवेश मिळवून दिला. मी अकरावीच्या वर्गामध्ये जाऊ लागलो वर्गातील मुलांचे गुण विचारले तर प्रत्येक मुलगा 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण कारण का तर त्या बॅचला ८०&२० म्हणजेच 80 गुण लेखी परीक्षेचे आणि 20 गुण तोंडी परीक्षेचे असे नवे मूल्यमापन होते.म्हणून भरमसाठ टक्केवारी मिळाळी होती.अकरावीच्या वर्गात मला असे वाटायचे. माझ्या वर्गात हे सगळे धावणारे रेसिंग मधले घोडे आहेत आणि या सर्वात मी एकटाच गाढव आहे. मी हार मानली नाही.मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले दहावीला जी चूक झाली ती चूक इथे होऊ द्यायची नाही, म्हणून सर्व विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि मला स्वाभिमानाने सांगावेसे वाटते की जी मुले दहावीला 80 ते 85 गुण होते त्याना 55 ते 60 या दरम्यान टक्केवारी होती.मी मात्र 65 टक्क्यांनी अकरावी विज्ञान उत्तीर्ण झालो होतो. आणि आता एव्हरेस्ट शिखर सुद्धा चढेल एवढा आत्मविश्वास माझ्यात आला होता.
बारावीचे वर्ष सुरू झाले. अकरावीला मला खूपच चांगले गुण मिळाले या अविर्भावात मी अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालो होतो.असा काहीसा प्रकार बारावी मध्ये झाला. मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले नाही. कॉलेजला जाणे मधेच लेक्चर बंक करणे असे प्रकार मी गुपचूप करू लागलो .कारण का तर माझ्यासोबत आमच्या गावातील एकही विद्यार्थी माझ्या कॉलेजला शिकत नव्हता. कधी कधी तीन वाजता घरी आल्यानंतर दादा विचारायचे आज लवकर घरी कस काय ? केवळ याच प्रश्नाला उत्तर द्यायला लागू नये म्हणून मी माझी ही घाणेरडी सवय बंद केली. आजोबा चौकशी करतात. त्यांना कुठून कळाले तर माझी काही खैर नाही .या भीतीने मी पण हा नको असलेला उद्योग सोडून दिला व नियमित कॉलेज करू लागलो. मला आठवते या घटने नंतरअगदी एक महिन्या भराच्या आतच आमचे दादा अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने आम्हाला सोडून गेले. हे आमच्या घरासाठी, आमच्या पंचक्रोशी साठी ,दादांच्या कार्यकर्त्यांसाठी पहाड कोसळल्या सारखे होते. कारण हे सर्व अचानक घडले त्यांच्या अंत्य यात्रेला अमाप लोक आले होते.
दादांची राजकीय कारकीर्द बहरात आली होती. अगदी काही दिवसातच ते खूप मोठ्या पदापर्यंत जाऊन पोहचले असते. कारण खूप मोठ्या नेत्यांमध्ये त्यांचे बसणे उठणे सुरू होते. आजोबांच्या निधनानंतर माझ्या वडिलांनी राजकारणात पाय ठेवला आणि ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले पण त्यांनी लावलेले राजकारणाचे बीज आता मोठे झाले होते पण हा ऐतिहासिक विजय बघायला आमचे दादा आमच्यात नव्हते हीच खेदाची बाब.मला माझी बारावीची मस्ती देखील चांगलीच नडली. मी 57 टक्के मिळवून बारावी विज्ञान पास झालो. कमी टक्क मिळाल्याने माझे जे स्वप्न होते कॉम्प्युटर इंजिनिअर बनण्याचे ते पूर्ण होईल की नाही. तेच समजत नव्हते. त्यावेळी मला सतत दादांची आठवण येत होती. आज दादा असते तर मला अमुक अमुक कॉलेजमध्ये त्यांच्या शिफारसीने सहज प्रवेश मिळाला असता पण असो असं म्हणतात ना नियती देखील एखाद्याची परीक्षा पाहत असते आणि माझी तर कित्येकदा पाहिले पण मी हार मानली नाही.
आमच्या गावापासून पंचवीस ते तीस किलोमीटर असणाऱ्या माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये पहिल्या यादीत नाही पण दुसऱ्या यादीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरच्या डिप्लोमा साठी मला प्रवेश मिळाला. असं म्हणतात ना दुध पिल्यावर ताक पण फुंकून पितो माणूस.अगदी तशीच अवस्था माझी झाली होती. दहावीत एक झटका बसला, बारावीत टक्केवारी कमी म्हणून दूसरा धक्का बसला.कारण प्रवेशाच्या वेळी अडचणी आल्या त्या महा भयंकर होत्या .आता मात्र ठरवले होते जे करायचे ते मनापासून करायचे म्हणून अगदी सुरुवातीपासूनच डिप्लोमाला असताना मन लावून अभ्यासाला सुरुवात केली.डिप्लोमाला गेल्यानंतर माझा विक पॉईंट इंग्रजी यावर मात मिळवण्यासाठी मी आता इंग्रजी मध्ये संभाषण करायचो .मी ज्या मित्रांसोबत खोलीमध्ये राहयचो त्या मित्रांसोबत इंग्रजी मध्ये संभाषण साधण्याचा प्रयत्न केला.माझे ते मोडके तोडके संभाषण ऐकून माझे मित्र माझी टर उडवू लागले .लेकिन रण (लढाईचे मैदान ) छोडे वह रणजीत क्या ? असाच काहीसा मी. मी माझे प्रयत्न सोडले नाहीत.मला आजही तो दिवस आठवतो की डिप्लोमाला असताना माझ्या एका विषयाचा सेमिनार अस्खलित इंग्रजी मध्ये दिले. माझे ते प्रेझेंटेशन बघून डिप्लोमा कॉलेजचे प्रमुख (hod )उभे राहून टाळ्या वाजवू लागले. त्यांनी माझे सर्वांसमोर खूप कौतुक केले.स्तुती प्रिय माझ्यासाठी तो जीवनातील एक आनंददायी क्षण होता. मी चांगल्या गुणांनी डिप्लोमा पास झालो. त्यानंतर डिग्री देखील तेथेच कंप्लिट केली ती देखील अगदी मन लाऊन बरे.
इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर आता काय करायचे ? मित्रांशी चर्चा केल्यावर मित्रांनी सुचवले कि सी डेक मध्ये सहा महिन्यांचा गव्हर्नमेंट डिप्लोमा आपण करूया म्हणजे लवकरात लवकर नोकरी मिलेळ म्हणून सी -डॅक चा कोर्स करण्यासाठी मी एंट्रन्स एक्झाम दिली व त्यामध्ये मला कांदिवली,मुंबई मधील एका महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला आणि अजून एक मी ज्यांचा फॅन आहे.अशा कॉमेडी सम्राटला म्हणजे कपिल शर्माला मला भेटता येईल असा दुहेरी हेतु मुंबईला येण्यामागे होता.ते मी त्याला कसे कसे भेटलो त्याविषयी वेळ भेटला तर नंतर कधी नक्की सांगेन.इंटरेस्टिंग आहे ते पण . तसा मी स्वभावाने लाजाळू पण एक्टिंग मला आवडत होती. सहा महिने मुंबईत राहिलो. घरापासून दूर राहणे मला आवडत नव्हते तरीदेखील शिक्षणासाठी मुंबईत राहिलो माझा सी-डॅक चा डिप्लोमा पूर्ण केला.मला गुणही छान मिळाले.
सी डेक डिप्लोमा पूर्ण झाला. मी व माझे मित्र नोकरीसाठी अप्लाय करू लागलो, पण बऱ्याच ठिकाणी अशी अट होती की दहावी बारावी आणि डिप्लोमा यांना 60 टक्के च्या वर गुण असतील तरच तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि माझा Bad Luck पहा ही मला बारावीला 57 टक्के गुण असल्याने माझे बरेचसे मित्र माझ्या पेक्षा टेक्निकल नॉलेज कमी असून देखील लवकर नोकरीला लागले आणि मी मात्र सर्व ज्ञान बऱ्यापैकी असून मुलाखतीसाठी देखील पात्र होत नव्हतो म्हणून तर मी म्हटलं की नियती माझ्या वारंवार परीक्षा घेत होती पण मी हार मानत नव्हतो. तुम्ही देखील मानू नका.आणि हो शिक्षण घेत असताना शेवटच्या क्षणापर्यंत गंभीर रहा नाहीतर माझ्यासारखी अवस्था व्हायची.
नोकरीच्या शोधात असताना एका कंपनीने सिलेक्शन करताना ज्याला C- DAC ला ज्याला जास्त गुण त्यांना इंटरव्यूला बोलावले होते.मला कुठेतरी आशेचा किरण दिसू लागला, कारण मला सी dak ला चांगले गुण होते. मुंबई येथील जुहू या ठिकाणी मी मुलाखतीसाठी गेलो मुलाखत घेण्यासाठी दोन व्यक्ती माझी मुलाखत घेत होत्या. त्यातील एक व्यक्ती माझी टेक्निकल नॉलेज आणि जोडीला hr होते . मित्रांनो मला सांगायला अभिमान वाटतो की जवळजवळ दीड तास माझी मुलाखत या ठिकाणी सुरू होती. मुलाखतीनंतर बाहेर आल्यानंतर इतर सर्व कॅंडिडेट माझ्याकडं वेगळ्याच नजरेने पाहत होते. मन आतून कुठे तरी म्हणत होते रणजीत कुछ तो है तेरे पास. आणि त्याच धुंदीत मी माझ्या माझ्या रूमवर गेलो मुलाखतीत काय - काय विचारले? मित्रांना याविषयी सांगू लागलो. साधारण एक-दोन दिवस गेले असतील संध्याकाळी सहाची वेळ आणि माझा मित्र रोशनचा फोन आला रणजीत तू दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये तुझे सिलेक्शन झाले आहे. माझा आनंद आज मात्र गगनात मावत नव्हता.आज मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन नोकरीला लागणार होतो. त्या क्षणी मला कोण आठवले तर ते आमचे दादा कारण हा आनंदाचा क्षण पहायला ते नव्हते .त्यांनी जे स्वप्न पाहिले होते की माझा नातू कॉम्प्युटर इंजिनिअर झाला पाहिजे चांगल्या नोकरीला लागला पाहिजे ते स्वप्न आज ते पुर्ण झाले होते त्या रात्री आम्ही खूप धमाल केली छान पार्टी केली.
नोकरीसाठी निवड झाली याचा आनंद होता पण नोकरीचे ठिकाण कोणते ? मुंबईमध्ये मुलाखत दिली म्हणून मुंबईतच नोकरी करावी लागेल अशी मनाची तयारी होती. मी मेल वरती लोकेशन पाहिले तर दिल्ली जवळ असणाऱ्या नोयडा या ठिकाणी मला अपॉइंटमेंट मिळाली होती. अगदी सुरुवातीपासूनच घरापासून लांब राहायला न आवडणारा मी सी-डॅकच्या शिक्षणासाठी मुंबईला आलो आणि आता नोकरीसाठी पुन्हा दिल्लीला जाणे जवळजवळ घरापासून दीड हजार किलोमीटरचे अंतर. मन पुन्हा नाराज होऊ लागले मी लोकेशन बदलुन मिळते का यासाठी खूप प्रयत्न केले परंतु काही उपयोग झाला नाही.
माझ्या घरच्यांना मी घरापासून दूर जातोय याचे दुःख होतेच पण नोकरीला लागतोय याचा आनंद देखील होता. माझी आजी ,आई ,वडील ,चुलते आणि नाना सर्वच खूश होते मी मात्र इतक्या दूर जायचे म्हणून आतून नाराज होतो, कारण घरापासून लांब राहणे माझ्यासाठी सगळ्यात अवघड काम होते. मनाला कसेतरी तयार केले रेल्वेचे तिकीट बुकिंग केले आणि जे नाना मला माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी गेट वरती सोडायला आले होते तेच नाना मला आज दिल्लीला नोकरीला जाण्यासाठी रेल्वे स्थानकापर्यंत सोडायला सोबत येत होते.माझा शाळेचा पहिला दिवस ते आज कम्प्युटर इंजिनियर ची नोकरी हे सगळे पाहणारे नाना आज माझ्या सोबत होते .सगळे लहानपण आठवत होते. रेल्वेस्थानकावर पोहचल्यावर जसा मी शाळेच्या पहिल्या दिवशी नाना मला परत घरी घेऊन चला यासाठी हात धरला होता. अगदी तसाच हात मी दिल्लीला ट्रेन मध्ये बसण्या आधी नानांचा पकडला. माझ्याबरोबर माझ्या नानाचे देखील डोळे भरून आले. आमच्या घरातील माझ्या मनाचा अंत किंवा माझ्या मनात काय सुरू आहे ? हे मला पाहून ओळखणारे दोनच व्यक्ती होत्या. एक माझी आई आणि दुसरे माझे नाना. नानांना माझी नाराजी दिसत होती ; पण काय करणार पर्याय नव्हता गाडी सुरु झाली माझा प्रवास नोयडा च्या दिशेने सुरु झाला.
गाडी मुंबई वरून मजल दर मजल करत गुजरात - राजस्थान- मध्य प्रदेश - अशी राज्य ओलांडत शेवटी दिल्लीला येऊन थांबली. इथून काही अंतरावरच नोयडा होते . मी माझ्या नोकरीचा नोयडातूनच श्रीगणेशा करणार होतो. जोईनिंग लेटर घेतले कामावर रुजू झालो. काही केल्या तिथे माझे मन लागत नव्हते. एक महिना बळेबळे काम केले आणि ती नोकरी सोडून दुसरी घराजवळ मुंबई किंवा पुणे या ठिकाणी नोकरी पकडण्याचा विचार केला. मी माझ्या मॅनेजर नीलिमा सत्तेचा यांना माझ्या राजीनामा विषय सांगितले.त्यांनी मला एक पर्याय सुचवला नोकरी सोडू नकोस .जरा चार दिवस गावी जा घरच्या लोकांना भेटून ये .परत आल्यावर तुझे मन लागेल मग मी राजीनामा देण्याचा विचार बाजूला करून दहा दिवस रजा घेऊन सोमंथळी म्हणजे माझ्या गावी आलो. या दहा दिवसात मी शांत बसलो नाही तर पुण्याला जाऊन मला कुठे नोकरी मिळते का ? याचा शोध घेऊ लागलो पण कुठे यश आले नाही .पहिल्यांदाच नोकरी लागली आणि ती सोडून द्यायची पहिल्या घासाला खडा कशाला? म्हणून मी पुन्हा दिल्लीला याचा निर्णय घेतला. दिल्लीत मन लावण्याचा प्रयत्न केला पण तरीदेखील दिल्लीत मन रमत नव्हते त्याच वेळी दिनेश पाटील नावाच्या एका ऑफिसरशी माझी ओळख झाली. त्यांना मी माझे दुःख सांगितले मला काही केले ते मन रमत नाही मी नोकरी सोडतो असे सांगितले त्यावर त्यांनी असे करू नको मी तुझी मुंबईला बदली करून देतो त्यांनी प्रयत्न देखील भरपूर केले परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही.
मी रोज संध्याकाळी घरी फोन करत असे. फोनवर बोलताना मी रडत देखील असे कारण मला घर सोडून राहायला आवडत नव्हते. मी माझ्या आईला,आजीला म्हणायचो की मी नोकरी सोडून घरी परत येतोय. माझे लहान चुलते कुस्त्यांच्या प्रशिक्षणासाठी सांगलीला राहत असल्यामुळे त्यांना हि घुसमट माहीत होती कारण पैलवानकी करावी हा दादांचा हट्ट होता. त्यांना सांगलीला काही केल्या करमत नव्हते म्हणून ते म्हणायचे " भैय्या तुला करमत नसेल तर निघून ये. आपण येथे पुण्याला नोकरी बघू " कारण का तर ती घुसमट त्यांना माहीत होती. अगदी या उलट माझे पप्पा माझा मुलगा दिल्लीला नोकरीला आहे असे छाती ठोकपणे सर्वाना सांगत होते आणि मी नोकरी सोडून परत घरी येणे त्यांच्यासाठी स्वाभिमानाचे नव्हते. ते मला म्हणायचे "सोल्जर आपल्या देशासाठी सीमेवर जातात नक्षलवादी एरियात लोक नोकऱ्या करतात त्यापेक्षा तर चांगल्या शहरात आहेस की लेका ! एक काम कर तुला महिन्याला विमानाने घरी ये विमानाच्या तिकिटाचे पैसे मी तुला पाठवत जाईन"खरच पैशा पेक्षा ज्ञान शिक्षण किती मोठे असते ते मला या प्रसंगातून कळले. पप्पा बोलले काही केल्या नोकरी सोडू नको. खरंच आपला मुलगा नोकरीला आहे. ही आपल्या आई वडिलांची मान उंचावण्यासाठी किती महत्वाची बाब असते हे मला या घटनेतून कळले.विद्यार्थी मित्रांनो! तुम्ही देखील चिकाटीने प्रयत्न करा आणि माझ्या पप्पा सारखी रुबाब मिरवण्याची संधी तुमच्या आई वडिलांना द्या.माझे पप्पा त्यांची मित्र मंडळी, राजकीय नेते मंडळी ,नातेवाईक यांना अगदी अभिमानाने सांगायचे. माझा मुलगा मुंबईत शिक्षण घेऊन देशाच्या राजधानी दिल्लीत कम्प्युटर इंजिनियर आहे.हळूहळू आता माझे मन तिकडे रमू लागले. कंपनीच्या माध्यमातून मला कामानिमित्त जयपुर, पटना ,कुलू मनाली चंदिगड या सारखी मोठ मोठी शहरे मला या नोयडाच्या नोकरीमुळे फिरायला मिळाली.वेगवेगळ्या भागातील लोक काय संघर्ष करतात.तो संघर्ष पहिला मिळाला. या अनेकांचा त्याग व संघर्ष पाहिल्यावर त्या पुढे माझा संघर्ष काहीच नाही याची जाणीव होऊ लागली. नंतर उर्वरित दीड वर्ष कसे गेले हे माझे मलाच कळले नाही. त्यानंतर मी माझ्या घरापासून जरा जवळ असणाऱ्या पुणे या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करू लागलो.
पुण्यामध्ये मी अनेक कंपन्यांचे इंटरव्यूव दिले त्यापैकी पाच कंपन्यांचे ऑफर लेटर मला आले . माझे टेक्निकल नॉलेज बघून म्हणजेच मी नोयडा सारख्या ठिकाणी काम केलेला आहे.ही जमेची बाजू म्हणून मला त्या संधी मिळत होत्या. बघा मित्रांनो संकट देखील संधी घेऊन येते.मी दहावीला नापास झालो नसतो तर मी आज कॉम्प्युटर इंजिनिअर नसतो. तुम्हीदेखील संकटांना घाबरू नका. संकटाला संधी माना. संकटांवर स्वार व्हा! मी पाच कंपन्यांपैकी इन्फोसिसच्या कंपनीची निवड केली .कारण का तर मला माळेगावचा तो दिवस आठवत होता ज्यावेळी मी डिप्लोमा करत होतो.आमच्या कॉलेजच्या गेटवर आमचे सीनियर इन्फोसिस मध्ये नोकरी लागणं म्हणजे भाग्याचे असे बोलत होते आणि त्याच कंपनीने मला नोकरीची ऑफर दिली होती .यासारखी स्वाभिमानाची बाब कोणतीच नव्हती. आज मी पोकळे दादांचा नातू ही माझी सुरुवातीची ओळख होती. यापेक्षा एक दहावी फेल ते नोयडा किंवा इंजिनियर अशी वेगळी ओळख मी निर्माण केली होती हा सगळा प्रवास छान होता . एक नापास मुलगा पण आज प्रयत्नांच्या जोरावर मेहनतीच्या जोरावर एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहे आणि महिन्याला किमान दोन लाखांचा पगार घेत आहे. पगार सांगण्याचा मुद्दा माझा मोठेपणा बिलकुल नाही तर तुम्ही देखील असे यश मिळवू शकता व दहा बाय दहाच्या खोलीतून तुमच्या परिवाराला शिक्षनाच्या माध्यमातून बाहेर काढू शकता.
माझ्या या लेखाला पूर्णत्व देत असताना एवढच सांगेन मित्रांनो स्वप्न नेहमी मोठी बघा!मनाला कायम प्रश्न विचारा ?वेळेचे नियोजन करा ? कुठे जायचेय ? आणि का जायचेय ?हे ठरवून घ्या. अर्धा ग्लास रिकामा आहे असे न म्हणता अर्धा ग्लास भरलेला आहे ,ही सकारात्मकता जीवनात ठेवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ताण-तणाव असता अडचणी असतात हे विसरू नका. माझा जो प्रवास तुम्ही आज जाणून घेतला त्यातून समजेल की कितीतरी अडचणी मला येत गेल्या पण मी हार मानली नाही. तुम्ही हार मानू नका.जीवनात संघर्ष करत असताना कोणतीही अडचण आली तरी हा रणजीत तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाप्रमाणे सहकार्य करेल कधी काही गरज पडली तर मला ९८२२२८२०५९ नंबरवर संपर्क करा. शेवटी एकच म्हणेन की माझा हा संघर्षमयी प्रवास प्रशांत सर सर्वापर्यंत एका वेगळ्या उद्देशाने पोहोचवत आहेत. तो उद्देश सफल व्हावा आणि त्यांच्या पुढे असलेली दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे त्यांचे विद्यार्थी अगदी करोडोंच्या टॉवर मध्ये जाऊन त्यांच्या आई-वडिलांचे गुरुजनांचे नाव रोशन करोत हीच सदिच्छा. पैशा बरोबर भारत देशाचे आदर्श नागरिक बना.तुम्हाला पुढील प्रगतीसाठी खूप खूप शुभेचा!
आजच्या आपल्या लेखातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व दहावी नापास ते आज कंप्यूटर इंजिनियर. किंवा दहावी फेल ते नोयडा . घरची गडगंज श्रीमंती पण मला माझं अस्तित्व हवे आहे. मला माझी वेगळी ओळख हवीय. यासाठी झटणारा माझा मित्र रणजीत. मला अजूनही आठवतंय की रणजीत लहान असताना मी ज्या ज्या वेळी त्याला भेटलो त्यावेळी पप्पू या टोपण नावाने हाक मारायचो. आज त्याचा संघर्षमय प्रवास पाहिल्यानंतर खरे तर एका राजकारणी घरात जन्माला आल्यानंतर पंचायत समित्या, जिल्हा परिषद यासारख्या निवडणुकांमध्ये स्वतः उमेदवार म्हणून उभा राहणं किंवा आपल्या वडिलांचा उजवा हात म्हणून प्रचार करणे यात त्याने हवे होते पण असे न करता एक नवी ओळख निर्माण केलीय. आज आपण पाहतो आपल्या भारतीय राजकारणात जी घराणेशाही आलेली आहे त्या घराणेशाहीला आमचा पप्पू मोठी चपराक देताना दिसत आहे. माझे आजोबा, वडील राजकारणात आहेत म्हणून मी राजकारणात गेले पाहिजे का ? तर नाही. मी म्हणून माझी एक वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे.हे त्याचे विचार खूप ग्रेट आहेत.
नोकरीच्या व्यापात रणजीतला ह्या लेखासाठी लागणारी माहिती पुरवायला नोकरीतील व्यसत्ततेमुळे वेळ भेटत नव्हता. किमान मी दोन-तीन वेळा विनंती केल्यानंतर त्याने वेळात वेळ काढून रात्री १२ ते १.३० च्या दरम्यान मला ऑडिओ च्या माध्यमातून हा प्रवास रेकॉर्ड करून पाठवला म्हणून त्याचे विशेष आभार. त्याचा जीवनातील दहावीच्या निकालाच्या दिवसाचा प्रसंग खरोखरच अंगावर शहारे आणणारा होता. या प्रसंगाने माझ्या देखील डोळ्यात पाणी आले.रणजितच्या या संघर्षमय प्रवासातून केवळ माझ्याच विद्यार्थ्यानी नव्हे तर जगभरातील जे जे संघर्षाला घाबरतात त्या सर्वांनी यातून प्रेरणा घ्यावी आणि आपल्या आई-वडिलांचे आपल्या गावाचे, आपल्या तालुक्याचे ,आपल्या जिल्ह्याचे ,आपल्या राज्याचे नि शेवटी आपल्या देशाचे नाव मोठे करावे एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करून आजच्या या विशेष लेखाला स्वल्पविराम देतो. पूर्णविराम यासाठी नाही की अशा अनेक प्रेरणादायी व्यक्ती आपल्या भेटीसाठीdnyanyogi.comवर येणार आहेत. हा लेख आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा तुमच्याकडे देखील असे काही प्रेरणादायी असेल तर आम्हाला ते कळवा नक्कीच त्याला dnyanyogi.com च्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचवण्याची हमी मी घेईन धन्यवाद!
एकदम मस्त 👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान
हटवाIt's inspiring to new generation.
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाSuccess is not final, failure is not fatal. it's the courage to continue that counts.
उत्तर द्याहटवाReally Inspirational journey. 🤝💐
Inspirational! Keep your face to the sunshine and you cannot see a shadow.
उत्तर द्याहटवाInspirational💯✌
उत्तर द्याहटवाप्रत्येक माणसामध्ये रणजित लपलेला आहे,, तुमच्या लेखामुळे तू रणजित बाहेर येण्यास नक्कीच मदत होणार आहे,, खूपच रंजक आणि प्रेरणादायक story ahe,,,
उत्तर द्याहटवाNice👏👏👏
उत्तर द्याहटवा