Type Here to Get Search Results !

सावरकरांचा अस्पृश्यता निवारण लढा | Savarkrancha Asprushyta Nivarn Ladha

सावरकरांचा अस्पृश्यता निवारण लढा | Savarkranchaa Asprushyta Nivarn Ladha  

                   स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव घेतल्यानंतर आपल्यासमोर उभे राहतात ते देशासाठी प्राणाचे बलिदान देण्यासाठी तयार असलेले एक महान व्यक्तिमत्व त्याचबरोबर हिंदुत्ववादाचे  कट्टर पुरस्कर्ते यात आपला दोष नाही कारण आपल्याला ओळखच अशी  करून दिली जाते.संपत्ती प्रमाणे जाती,धर्माच्या आधारावर महान व्यक्तीना थीटे केले जाते हेच खरे वास्तव आहे.आजही  अस्पृश्यता लढा म्हटल्यानंतर आपल्यासमोर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी ही नावे प्रामुख्याने पुढे येतात पण त्यांच्याच जोडीला अस्पृश्यता निवारण लढा लढणारे सावरकर मात्र दुर्लक्षित होतात तर आजच्या या लेखातून सावरकर महान अस्पृश्यता निवारक कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. 
                अस्पृश्यांसाठी कार्य करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वर्गाला म्हणजे  अस्पृश्य वर्गाला आत्मविश्वासाने उभे रहा, आपल्या मध्ये गुणवत्ता आहे हे सिद्ध करा असा आत्मविश्वास निर्माण करत होते तर त्याच काळात महात्मा गांधी समाजातील उच्चवर्णीयांना असे आव्हान करत होते की भूतदया दाखवा आपण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत अस्पृश्य याना जातीने न न हिनवता  त्यांना हरिजन म्हणजे देवाची लेकरे म्हणा अशी मांडणी करत होते. मात्र अस्पृश्य निवारणासाठी सावरकरांची विचार करण्याची पद्धत जरा वेगळीच होती त्यांनी हिंदूंनी बुद्धीने जागे व्हा असे आवाहन त्यांनी केले. थोडक्यात काय कोणताही निर्णय घेत असताना पिढ्यान् पिढ्या चालत आलेले आहे ते न करता आपली बुद्धी विचारांच्या चौकटीत जे बसते ते करा. अस्पृश्यता निवारण लढा  सावरकरांनी कसा दिला ते सविस्तर पाहूया. 

सावरकरांचा अस्पृश्यता निवारण लढा
सावरकरांचा अस्पृश्यता निवारण लढा

सावरकरांची माहिती(toc) 

अस्पृश्यता निवारणासाठी सावरकरांचे योगदान | Asprushyta Nivarnasathi Savarkranche Yogdan 

1. चातुर्वर्ण्य व्यवस्था  हद्दपार | Chaturvarnya Vyavsthaa Haddpar 

                      सावरकरांच्या मते हिंदू धर्म वाईट नसून समाज रचनेत आलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणजे  ब्राह्मण क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशीच जी  व्यवस्था आहे ती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. असे झाल्यास जातीच्या नि व्यवसायच्या आधारावर जो भेदभाव केला जातो तो होणार नाही. 

2. सहभोजनाचे कार्यक्रम  |  Sahbhojnache Karykram 

                    सावरकरांनी अस्पृश्यता निवारण करण्यासाठी सर्व जाती धर्मियांचे सहभोजन म्हणजे एकत्र येऊन खानपान करणे, यासारखे उपक्रम राबवले. त्या काळामध्ये लोक जातीला धरून चिटकून होते. स्पृश्य-अस्पृश्य,उच्च जात ,कनिष्ट जात मानत होते आणि ते कमी करण्यासाठी केवळ उपदेश करणे उपयोगाचे नव्हते तर प्रत्यक्ष कार्यवाही अपेक्षित होती. अशीच कार्यवाही सावरकरांनी केली आणि त्यासाठी त्यांनी सहभोजन हा कार्यक्रम हाती घेतला. सुरुवातीला या सहभोजनाला  तितकासा प्रतिसाद मिळत नव्हता; पण कालांतराने लोकांमध्ये एक जाणीव जागृती निर्माण करण्याचे काम सावरकरांचे उपक्रमाने केले व प्रतिसाद मिळू लागला. 

3. सह पूजनाचे कार्यक्रम | Sah Pujan Karykrmache Aayojn

                        सावरकरांनी अस्पृश्यता निवारणाचा लढा देताना अजून एक कार्यक्रम हाती घेतला. तो म्हणजे मंदिरामध्ये पूजा करत असताना सर्वांनी मिळून मंदिरामध्ये पूजा करावी.  कनिष्ठ जातीचा म्हणून त्याला पूजा करण्याचा अधिकार नाही हे सावरकरांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी सर्वांनी मिळून एकत्र पूजा करणे या उपक्रमाने कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता निवारणाला मदत केली. 

4.रत्नागिरी हिंदू सभेची स्थापना | Ratnagiri Hindu Sabha 

                    ब्रिटिशांनी सावरकरांना कैद करून ठेवले होते हे आपणास माहीत आहे या  कैदेतून सुटका करताना त्यांनी  विनायक सावरकरांना बजावले होते की आपण यापुढे कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभाग घ्यायचा नाही याच अटीवर आपली करीत आहोत. अशावेळी सावरकरांना समाजाच्या कल्याणासाठी काहीतरी केले पाहिजे याच प्रेरणेतून त्यांनी सामाजिक चळवळीसाठी रत्नागिरी हिंदू सभेची स्थापना केली.या सभेच्या माध्यमातून त्यांनी  आपण हिंदू सारे एक आहोत आपापसात केले जाणारे जातिभेद आपल्या प्रगतीस मारक आहेत अशी मांडणी केली. या सभेमध्ये त्यांनी अस्पृश्यता निवारण कार्य करण्यासाठी एक स्वयंसेवक मंडळ स्थापन केले पाहिजे असा विचार मांडला आणि या विचारानुसार अस्पृश्यता निवारणासाठी एक स्वयंसेवक मंडळ स्थापनही करण्यात आले. 

5. व्याख्यानातून प्रबोधन | Vyakhyanatun Prabodhan 

                      सावरकरांचे वाचन प्रचंड होते ते ठिकठिकाणी व्याख्यानासाठी जात आणि या व्याख्यानातून अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे यासाठी प्रतिपादन करत. चिपळूण मध्ये झालेल्या एका व्याख्यानात त्यांनी 'अस्पृश्यांचा उद्धार आणि त्याचे शुद्धीकरण' या विषयावर आपले विचार मांडले या व्याख्यानामध्ये त्यांनी मी ब्राह्मण, मराठा, महार अशा जाती मानत नाही तर मी एकच जात मानतो ती जात म्हणजे हिंदू यातून त्यांना अपेक्षित असलेली हिंदूंची व्याख्या किती व्यापक होती हे आपल्याला समजते.पण आज सोयीचा अर्थ काढला जातो तो भाग वेगळा. 

6. वर्तमानपत्रातून लेखन | Vartmanpatratun Lekhan 

                      स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वृत्तपत्रांमधून लेखन करून अस्पृश्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. त्या काळामध्ये विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत असताना अस्पृश्य मुलांना वेगळी जागा दिली जात होती किंवा ठेवली जात होती हे कसे चुकीचे आहे.  शिक्षणातूनच असा भेदभाव केला गेला तर आपल्या देशाचा विकास कसा होणार? असे मत त्यांनी मांडले यातून त्यांना हिंदुत्व जरी प्रिय असले तर या हिंदूंमध्ये जातीच्या आधारावर केले जाणारे भेद यांना कधीच मान्य नव्हते आणि आज राजकीय पुढारी याच भेदावर मताचे ध्रुवीकरण करतात ही खेदाची बाब. 

 7. मंदिरप्रवेश | Mandir Prvesh Ladha 

                            रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. तो प्रवेश मिळावा यासाठी रत्नागिरीच्या दंडाधिकारी याना सावरकर यांनी  निवेदन दिले. हे निवेदन दिल्यानंतर दंडाधिकारी ते निवेदन घेण्यासाठी मंदिरासमोर आले त्यावेळी सावरकरांनी आवेशपूर्ण भाषण केले या भाषणातून दंडाधिकारी यांनादेखील कळाले की एका विशिष्ट समाजाला मंदिरात जाण्यापासून रोखणे किती चुकीचे किती चुकीचे आहे आणि त्यांनी सर्वांना मंदिर प्रवेशाची मुभा दिली. आज जरी या गोष्टी सोपे वाटत असल्या तरी त्या काळी सावरकरांचे योगदान अतिशय मोलाचे आहे

८ . हळदी कुंकू समारंभ | Haldi Kunku Samarambh 

                  सावरकरांनी अस्पृश्यता नष्ट होण्यासाठी जातिभेद नष्ट होण्यासाठी महिलावर्ग सजग झाला पाहिजे यासाठी त्यांनी हळदीकुंकू समारंभ सारख्या समारंभाचे आयोजन केले ,यामुळे लोकांच्या मनात किंवा स्त्रियांच्या मनात जे काही जातीयता केव्हा अस्पृश्यता याविषयी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चुकीच्या कल्पना यांना छेद गेला. 

 ९ . विविध सण उत्सवात अस्पृश्य लोकांचा सहभाग | Asprushya Vargachaa Vividh Karykramt Sahbhag 

               मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळ वाटपापासून , दसऱ्याच्या सणाला सोने लुटण्याची वेळ असो  सावरकर आपल्यासोबत कनिष्ठ जातीतील लोकांना सोबत घेऊन हिंदू बांधवांच्या घरी जात व त्यांना ते भेदाभेद कसे चुकीचे आहेत हे समजावून सांगत. 

१०. स्वच्छतेचे  महत्व | Swachteche Mhattv 

              आर्थिक परिस्थितीमुळे किंवा शिक्षणापासून वंचित असल्यामुळे कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे आणि त्याच मुळे अनेक लोक आपला दुस्वास करतात हे अतिशय स्पष्टपणे अस्पृश्य लोकांना समजावून सांगण्याचे काम सावरकरांनी केली.ज्याप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत की राहणीमान पाहून  आपली जात कोणी ओळखता कामा नये. अगदी तसेच विचार सावरकरांचे होते त्यासाठी त्यांनी वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक स्वच्छता व शिक्षण यांचे महत्त्व या लोकांना समजावून सांगितले. 

११. परंपरागत व्यवसाय सोडण्याचे आवाहन | Parampragt Vyavsay Sodnyache Aavhan 

                            अस्पृश्य वर्गाला तुम्ही परंपरेनेच चालत आलेले व्यवसाय जे करता आणि ते व्यवसायातूनच तुमची एक समाजात तेव्हा तेवढीच ओळख निर्माण होते यासाठी तुम्ही व्यवसाय करत असताना परंपरेने जातीला  चिकटून आलेले व्यवसाय सोडून द्या. नवीन व्यवसाय सुरु करा. असे आवाहन केले व केवळ आव्हानच नाही तर त्यासाठी विविध संस्थांकडून लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे काम सावरकरांनी केले. यातून सावरकरांचा अस्पृश्यता निवारण लढा किती कृतिशील होता ते समजते. 

१२. स्वातंत्र्यवीर सावरकर धर्मांतराला विरोध | Savrkrancha Dhrmantarala Virodh 

                     कारण सावरकरांच्या मते धर्मांतर करून प्रश्न सुटणार नाहीत.तर समाजामध्ये अस्पृश्यता प्रथा आहे ती बंद झाली पाहिजे आणि एकसंघ असा हिंदू समाज किंवा हिंदू राष्ट्र निर्माण झाले पाहिजे. अशी भूमिका त्यांनी मांडली आपला धर्म सोडून जे परधर्मात गेलेले आहेत त्यांना पुन्हा हिंदू धर्मात येण्याचे आवाहन त्यांनी केले इथे आपल्याला आंबेडकरांचा पेक्षा वेगळा विचार सावरकरांचा दिसतो . कदाचित असे झाले असते तर जातीची शकले आज पाह्यला मिळाली नसती असे मला वाटते. 

१३. पतित-पावन मंदिराची उभारणी | patit Pavan Mandir Ubharani 

                                     सावरकरांच्या मनामध्ये असा विचार होता की सर्वांनाच प्रवेश असेल असे एखादे नव्याने मंदिर उभे राहावे आणि यासाठीच त्यांनी पतित-पावन मंदिराची उभारणी केली.यातून जाती धर्म विसरून एकत्र दर्शन घेऊ लागले. 

१४ आंबेडकरांच्या लढ्याला पाठिंबा | Aambedkranchya Ladhyala Pathimba 

                             डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता.  चवदार तळ्याच्या लढ्यातून दलितांसाठी चवदार तळ्यातील पाण्याचा हक्क मिळणार होता. या लढ्याला सावरकरांनी जाहीर पाठिंबा दिला होता. 
                                   वरील लेख पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की सावरकर अस्पृश्यता निवारक म्हणून किती श्रेष्ठ होते;पण आपल्या समोर केवळ एक हिंदुत्ववादी चेहरा किंवा स्वातंत्र्यवीर एवढीच बाजू मांडली  जाते असे न करता एखाद्या व्यक्तिमत्त्वामध्ये असलेले सर्वच्या सर्व पैलू लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते; पण असे होताना दिसत नाही ही खंत. थोडक्यात काय तर लेखन क्षेत्रात देखील असे भेदाभेद चालतात असो तर या लेखनातून सावरकरांचा अस्पृश्यता निवारण लढा या लेखातून  सावरकरांचे अस्पृश्यता निवारण कार्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. हा नक्कीच आपणास आवडेल.  धन्यवाद!

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area