वटपौर्णिमा सणाची माहिती कथा पूजा विधी मुहूर्त गाणे उखाणे,शायरी| Vatpournima Mahiti Katha Pujaavidhi Muhurt Gane Ukhane Shayri
आजच्या लेखात वटपौर्णिमा सणाची माहिती, कथा पूजाविधी,मुहूर्त, गाणे, उखाणे,शायरी या लेखामध्ये आपण ज्या सणाला सुवासिनीचा सण म्हणून ओळखले जाते अशा वटपौर्णिमा सणाची माहिती पाहणार आहोत.
वटपौर्णिमा सणाची माहिती |
वटपौर्णिमा सणाची माहिती | Vatpournima Sanachi mahiti
जो पती आपल्या आई वडिलांच्या पश्चात आपल्या सुख दुःखात साथ देतो आपल्याला हवे नको ते विचारतो एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी काबाडकष्ट करतो त्याच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी ईश्वराकडे मागणी करण्याचा सुवासिनींचा सण म्हणजे वटपौर्णिमा होय.
वटपौर्णिमा सणाचा मुहूर्त | Vatpournima Muhurt
वटपौर्णिमा हा सण कधी साजरा केला जातो? याविषयी सांगायचे झाले तर हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा ही साजरी केली जाते.साधारणपणे वटपौर्णिमेचा मुहूर्त हा प्रातःकाळी असतो. हा वटपौर्णिमा सण का साजरा केला जातो?या विषयी एक कथा सांगितली जाते ती आपण बघूया.म्हणजे या सणाचे महत्व अधिक चांगल्या रीतीने आपल्याला समजेल.
वटपौर्णिमेची सत्यवान सावित्री यांची कथा | Vatpournima Katha
महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वटपौर्णिमा साजरी केली जाते. या वटपौर्णिमेमागे सावित्रीची एक कथा सांगितली जाते. सावित्री कोण तर भद्र देशांमध्ये अश्वपती नावाचा एक राजा होता. या राज्याची अतिशय देखणी, हुशार, नम्र आणि श्रध्दाळू मुलगी म्हणजे सावित्री होय. सावित्रीचे वडील राजा अश्वपती आपली मुलगी एकुलती एक असल्यामुळे तिचा संसार सुखा समाधानाने झाला पाहिजे यासाठी सावित्रीने स्वतः उपवराविषयी म्हणजेच जोडीदार निवडण्याविषयी निर्णय घ्यावा असा प्रस्ताव त्यांनी सावित्री पुढे ठेवला. सावित्रीला वधू म्हणून स्वीकारण्यासाठी अनेक राजपुत्र तयार होते .कारण ती दिसायला सुंदर व गुणी मुलगी होती.परंतु सावित्री ही जरा वेगळ्या विचारांची होती मला ऐशो आरामात ठेवणारा पती नकोय.तर मला गुणसंपन्न वर हवाय ही तिची अट होती. म्हणूनच तिने आलेल्या अनेक उपवरांपैकी धृमत्सेन राजा की जो आंधळा होता एका लढाईमध्ये हरला होता.जंगलामध्ये आपला उदरनिर्वाह करत होता. हे माहित असून देखील त्या धृमत्सेन राजाचा मुलगा सत्यवान हा अतिशय गुणवान आहे याची सावित्रीला जाणीव झाली. या कथेच्या माध्यमातून माध्यमातून आजच्या पिढीतल्या तरुणांना एक बाब सांगावीशी वाटते की जोडीदार शोधत असताना रंगरूप पाहू नका. तर त्या व्यक्ती मधील मुलांची पारक करा,कारण का तर संसार करत असताना रंगापेक्षा समोरच्या व्यक्तीशी आपले विचार जुळतात हे जास्त महत्वाचे असते.असो ......
एका लढाईमध्ये हरलेल्या राज्याच्या मुलाशी म्हणजेच सत्यवानाशी लग्न करण्याचा निर्णय सावित्रीने घेतला. हा निर्णय ऐकून तिथेच उभी असणाऱ्या नारदांनी सावित्रीला सावध केले.या सत्यवनाचे उर्वरित म्हणजेच शिल्लक असलेले आयुष्य फक्त एक वर्ष आहे. तू तुझा लग्नाचा विचार बदलावा. परंतु सावित्री ढळली नाही ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली.तिने सत्यवानाशी विवाह केला. संसाराला सुरुवात झाली.सत्यवान -सावित्री यांचा संसार अतिशय आनंदात सुरू होता. पती,सेवा सासू-सासर्यांची सेवा ती करत होती. पण तो दिवस कोणासाठी थांबतात का? बघता बघता वर्ष संपायला फक्त तीन दिवस बाकी होते. त्यावेळी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे या काळाच्या कचाट्यातून मी माझ्या पतीला सहीसलामत सोडवावे या भावनेनं सावीत्री एक व्रत करत होती. या वृत्ताचा शेवटचा दिवस म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवस.या दिवशी सत्यवान आणि सावित्री जंगलामध्ये लाकूड फाटा तोडण्यासाठी गेले होते.दुपारची वेळ होती लाकडे तोडता तोडता सत्यवानाला भोवळ आली.हे पाहून सावित्री घाबरली आजूबाजूला पाहू लागली तर तिला रेड्यावर स्वार होऊन आलेला एक भला मोठा माणूस दिसला. आपल्या पतीला म्हणजेच त्याच्या प्राणांना घेऊन जात आहे, म्हणून ती त्याचा पाठलाग करू लागली.तुम्ही माझ्या पतीला सोडा! माझ्यासाठी ते माझे सर्वस्व आहेत.अशी विनवणी करू लागली पण तो रेड्यावर आलेला दुसरा तिसरा कोणी नसून यम देवता होती.यम देवतेने सांगितले मला जो आदेश आहे त्याचे मला पालन करावेच लागेल.तुझ्या नवऱ्याला मी सोडू शकत नाही, तू माघारी फिर. यम पुढे चालत होता आणि त्या पाठोपाठ सावित्री त्याचा पाठलाग करत होती. यमला वाटले मी रेड्यावर आहे. ही बाई चालत आहे थकली की माघारी जाईल. आपण आपले काम करूया. सावित्री हार मानणारातील नव्हती अशा तणावाच्या वातावरणात देखील यमाला प्रश्न करत होती. कुठेतरी माझा संसार सुरू होऊन एकच वर्ष झाले यामध्ये माझा दोष काय?माझ्या पतीचा गुन्हा काय ? असे अनेक प्रश्न तिने यमदेवाला विचारले. थोडक्यात काय तर शास्त्रानुसार यमाशी वाद घातला. परंतु यमाला तर आदेशाचे पालन करणे याशिवाय कोणताच मार्ग दिसत नव्हता,म्हणून यमाने सावित्रीला सांगितले. मी तुला तीन वर देऊ शकतो हे माझ्या अधिकारात आहे पण तुझा पती तुला परत करू शकत नाही. तीन वर माग.सावित्रीने सांगितले मला तीन वर नको मला माझा पतीच परत हवाय.दोघांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली. सावित्री विचार करू लागले की आता युक्तीने काम करायला पाहिजे आणि तिने सांगितले हे यमदेवा मी तीन वर मागते.यामध्ये तिने पहिल्या वरा मध्ये माझे सासरे आंधळे आहेत त्यांना दृष्टी प्राप्त होउ दे,दुसऱ्या वरामध्ये माझ्या सासर्यांचे गेलेले राज्य परत मिळू दे असा वर मागितला. शेवटचा वर म्हणजे माझ्या सासर्यांच्या मांडीवर त्यांची नातवंडे खेळूदे. यम अगोदरच वैतागलेला होता हे सगळं सासऱ्यासाठी मागतेय या ब्रम्हात तो तथास्तु बोलला आणि नंतर त्याच्या लक्षात आले सावित्रीच्या सासऱ्यांना नातवंडे झाली पाहिजेत आणि तिच्या पतीला तर मी घेऊन चाललोय मी दिलेला वर पूर्ण कसा होणार .आणि शेवटी सावित्रीचे पती प्रेम व तिची एकनिष्ठा पाहून यम देवतेने तिच्या सत्यवानाला तिच्या हाती परत केले.म्हणून तर आज देखील एखादे जोडपे जर सुखासमाधानाने संसार करत असेल तर तो सत्यवान सावित्री चा जोडा म्हणून ओळखला जातो. या कथेतून सावित्रीचे आणि वटपौर्णिमेचे महत्व आपल्याला समजले असेल. यम म्हणजे काळ.या काळाच्या मगरमिठीतून नवऱ्याला परत आणणारी स्त्री म्हणजे सावित्री. म्हणूनच ही ज्येष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
वटपौर्णिमा पूजा साहित्य | Vatpournimesathi Sahitya
वटपौर्णिमा करण्यासाठी म्हणजेच वडाची पूजा करण्यासाठी सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती लागतात.त्याचबरोबर हळदी-कुंकू, सुगंधी फुले,पंचामृत,साजूक तूप,वडाला ओवाळण्यासाठी निरंजन किंवा दिवा. त्याच बरोबर आंब्याचा वाण लागतो वडाला सात फेऱ्या मारण्यासाठी धागा. या साहित्याची जमवाजमव करावी लागते.
वटपौर्णिमेची पूजा विधि व व्रत | Vatpournima Pooja Vidhi V Vrat
काही स्त्रिया हे वृत्त वटपौर्णिमेच्या अगोदर तीन दिवस फलाहार करून उपवास करतात.परंतु ज्यांना शक्य नाही त्या महिला वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त उपवास करतात. वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी किंवा तो विधी करण्यासाठी सुवासिनी स्त्रिया प्रातःकाळी म्हणजेच सकाळी लवकर उठतात.अभ्यंगस्नान करतात. अभ्यंगस्नानानंतर आपल्या घरातील कुलदेवता तसेच इतर देवतांची पूजा करतात. तुळशीची पूजा करतात. घरातील थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतात.गणपतीचे दर्शन घेतात आणि नंतर टोपल्यांमध्ये सत्यवान आणि सावित्री यांची मूर्ती ठेवतात. याचबरोबर वरील जे साहित्य आहे ते सर्व साहित्य त्यामध्ये ठेवतात आणि वडाच्या झाडाखाली सुवासिनी स्त्रिया एकत्र येतात.एकत्र आल्यानंतर सर्वप्रथम सत्यवान आणि सावित्री यांची पूजा करतात.वडाला निरंजन ओवळतात व शेवटी वटपौर्णिमेची गाणी गात वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारतात व प्रार्थना करतात की सात जन्म हाच पती मला मिळू दे.अशा पद्धतीने वडाची पूजा केली जाते.
वटपौर्णिमेची प्रार्थना | Vatpournima Prarthna
वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाला वंदन करून तुझ्या पारंब्या प्रमाणे माझ्या कुटुंबाचा देखील विस्तार होऊ दे .तू जसा दीर्घायुशी आहे तसे माझ्या पतीला दीर्घायुष्य दे. त्याला उत्तम आरोग्य दे.मला अखंड सौभाग्य दे. अशी प्रार्थना करतात थोडक्यात काय तर जोडीदाराला चांगले आयुष्य आणि माझ्या कुटुंबाची बरकत कर. अशीच प्रार्थना वटपौर्णिमेच्या सणादिवशी दिवशी केली जाते.
वटपौर्णिमा का साजरी केली जाते? | Vatpournima Ka Sajri Keli Jate
अलीकडच्या तरुण पिढीला नेहमी सण-उत्सव यांच्याविषयी प्रश्न पडतात. हे सण उत्सव का साजरे केले जातात?वटपौर्णिमा का साजरी केली जाते? हा देखील आपल्याला प्रश्न पडत असेल तर वटपौर्णिमा यासाठी साजरी केली जाते की या दिवशी सावित्रीने आपल्या पतीच्या प्राणाचे रक्षण केले व यमाकडून त्याला सोडवून आणले म्हणून तिची आठवण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते. त्याचबरोबर पती आदर आणि पतीच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना करण्याचा दिवस म्हणून देखील वटपौर्णिमा साजरी केली जाते.
वटपौर्णिमेचे गाणे कविता | Vatpournima Kavita Kinva Gaane
वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यवान आणि सावित्री यांची जी कथा आहे ती गीताच्या रुपाने सादर होत असते. आणि वडाची पूजा करणाऱ्या महिला वडाला सात फेरे मारत असताना वटपौर्णिमेची गाणीही म्हणजेच वटपौर्णिमेच्या कविता गात असतात.अनेक मराठी चित्रपटात वटपौर्णिम गाणी सादर होताना आपल्याला दिसतात.शपथ चित्रपटातील असेच एक वटपौर्णिमेचे महत्व सांगणारे गीत त्या कवींचे आभार गीतकार मला अज्ञात आहेत.
सण वर्षाचा आनंदाचा,
वटसावित्री पुनवेचा,
सुखी ठेव धनी माझा,
देवा मान माझा कुंकवाचा.
लाख मोलाच सासर,
जसे माझं मायेच माहेर,
नाही ऊनीव कशाची,
पती माझा तालेवार,
माता पिता परी सासू-सासरे,
वर्षा व करती ममतेचा.
सुखी ठेव धनी माझा
देवा मान कुंकवाचा|2|
खरोखरच या वटपौर्णिमेच्या गाण्यांमधून महिलांना काही क्षण का होईना आपल्या रोजच्या व्यापातून नक्कीच काही सुखाचे क्षण जगायला भेटतात.
वटपौर्णिमेला वडाची पूजा करण्यामागे शास्त्रीय कारण | Vadachya Pujemagil Shastriy Karan
भूतलावरती जेवढे वृक्ष आहेत त्यापैकी सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा वृक्ष कोणता असेल तर तो आहे वटवृक्ष.पूर्वीच्या काळी शेती करत असताना खूप मोठ्या प्रमाणात वडाची झाडे तोडली गेली. आणि कदाचित याच भूमिकेतून पूजेच्या निमित्ताने का होईना या झाडांचे संरक्षण होईल ही देखील भूमिका आपल्याला यामागे दिसते.
वटपौर्णिमेला हे करूनका |Vatpornimela He Karu Naka
वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनीचा सण असतो. त्यामुळे घरातील वातावरण आनंददायी ठेवावे.त्याचबरोबर शहरी भागामध्ये जर आपल्या परिसरात किंवा आजुबाजूला वडाचे झाड नसेल तर घरामध्ये वडाची फांदआणून तिची पूजा केली जाते असे करू नका ज्या वडाकडे आपण आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागतो आणि त्याच वडाची फांदी तोडतो हे चुकीचे आहे.
वटपौर्णिमे दिवशी पूजेसाठी वड नसेल तर काय करावे| Vat Pujesathi Uplabdh Nahi Kaay Karave
सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेनुसार सावित्रीला पुन्हा सत्यवानाचे प्राण प्राप्ती झाली ती वडाच्या झाडाखाली. म्हणूनच वडाची पूजा केली जाते जर आपल्या जवळपास वड नसेल तर घरामध्ये चौरंग मांडून त्या चौरंगाला सात फेऱ्या घालाव्यात किंवा घरामध्येच विविध रंगांच्या रांगोळ्या वापरून वडाचे जमेल तसे झाड काढावे आणि त्याची पूजा करावी.
वटपौर्णिमेचे उखाणे| Vatpournima Ukhane
हिंदु सण उत्सवांमध्ये, लग्न समारंभामध्ये मकर संक्रांति, नागपंचमी या सणादिवशी आवर्जून उखाणे घेतले जातात.या उखान्यामधून आपल्या पतीचे कौतुक केले जाते. आपल्या सासरच्या मंडळींची कौतुक केले जाते. किंवा कधीकधी आपल्या मनातील व्यथा देखील उखान्यातून मांडली जाते.महिलांना मनातील भावना अप्रत्यक्ष का होईना व्यक्त होण्याची संधी म्हणजे उखाणे। वटपौर्णिमेला देखील महिला एकत्र जमल्यावर उखाणे घेतात. नमुना म्हहून काही उखाणे पाहूया....
1.मुमताज साठी शहाजान यांनी बांधलाय म्हणे ताज,
..... रावांचे नाव घेते वटपौर्णिमा आहे बरं आज.
2. हिमालयावर पसरल्या की हो बर्फांच्या राशी
........ रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी.
3. ग्रंथ पुराने वाचून बोध झालाय आज,
..... रावांचे नाव घेते.
वटवृक्षा दीर्घायुष्य दे माझ्या सख्याला.
4. वटवृक्षाजवळ गेले तर त्याने ,
मला सांगितला सावित्रीचा ध्यास,
..... रावांचे नाव घेते वटपोर्णिमा आहे खास.
वटपौर्णिमेचे उखाणे सुवासिनींना आपल्या पतीविषयी आदर व्यक्त करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या मैत्रिणींमध्ये आपले इंप्रेशन पाडण्यासाठी तरी नक्कीच उपयोगी येतील आणि जुन्या परंपरा ज्या लोप होत आहेत त्या जपल्याचे समाधान देखील मिळेल.
वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश | Vat Pournima Shubhecha, SMS
आज मी वडाला गुंडाळला धागा,
काही झाले तरी हलणार नाही,
हृदयातील सत्यवानाची जागा.
वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
2. वटपौर्णिमा दिवशी सावित्री, मी देतेय तुला वचन,
दुरावणार नाही माझ्यापासून माझा साजन.
वटपौर्णिमेच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
3. सात जन्माची सात वचने,
काहीही होवो सजना तुझ्या संगे जगने.
वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
वटपौर्णिमेची शायरी | vatpournima shayri
आज-काल शायरीचा जमाना आहे वटपौर्णिमा शायरी देखील आपण पाहूया...पण ती सादर करताना तश्या अदाकरीत सादर करावा ही विनंती.
1.पौर्णिमेचा चंद्र आज बहरला आहे,
वटपौर्णिमेला साज शृंगार मी आज केलेलाच आहे,( 2 )
पुढचे सात जन्म नाही तर तुजसंगे अखंड प्रवास ठरलेलाच आहे.
आता जगणेही तुझ संगेच आणि भांगणे ही तुझसंगेच आहे.
2. भाग्य माझे मज मिळाला तू,
जीवनाचा खरा आनंद दिलास तू,
माझ्या अपूर्णत्वाला पूर्णत्व दिलेस तू,
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू
कल्पनाच मनाला शिवत नाही
काय सांगू सजना ,तू सोबती हे केवळ भाग्य माझे.
या शाहिरीच्या माध्यमातून अगदी धुमधडाक्यात गृहिणींनी वटपौर्णिमा साजरी करावी.
FAQ| वटपौर्णिमा बद्दल काही प्रश्न
1. 2022 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे
2022 मध्ये 14 जून ला वटपौर्णिमा आहे.
2. 2022 मध्ये वटपौर्णिमा कोणत्या वारी आली आहे?
2022 मध्ये वटपौर्णिमा मंगळवारी आली आहे.
3. शास्त्रानुसार वटपौर्णिमेचा उपवास किती दिवसांचा असतो
शास्त्रानुसार वटपौर्णिमेचा उपवास तीन दिवसांचा असतो.
अशा पद्धतीने आज आपणवटपौर्णिमा सणाची माहिती,कथा, पूजा विधी, मुहूर्त, गाणे उखाणे,शायरी या सर्वांची माहिती पहिली.एवढेच नाही वटपौर्णिमे दिवशी काय करावे?काय करू नये?अशी सर्व माहिती पहिली.ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल.आवडल्यास आपली माता,बहीण,आत्या,मैत्रिणी यांच्या पर्यंत लेखाच्या शेवटी Sher it या बटनाच्या माध्यमातून सर्वां पर्यंत जरूर पोहोचवा.हा लेख कसा वाटला नक्की कमेंट करा.
आमचे हे लेख देखील आपणास खूप आवडतील
साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला सण म्हणजे अक्षय तृतीया
रामनवमी - प्रभू राम यांचा जन्मदिवस
प्रेम करावे पण एकतर्फी नको त्याची घातकता
दहावी नापास पण आज कम्प्युटर इंजिनियर. हा लेख विद्यार्थी,पालक,शिक्षक सर्वानी वाचावा