एकतर्फी प्रेम आणि घातकता | Ektarfi Prem Aani Ghatkata

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! मी आज एका गंभीर विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. म्हटलं तर आजच्या लेखाचा विषय प्रेम आहे मग गंभीर कसा? हो आहे. कारण त्यापुढे एक विशेषण लागले आहे.ते नुसते प्रेम नाही तर एकतर्फी प्रेम आहे. चला तर मग आज पाहूया एक तर्फी प्रेम आणि घातकता. म्हणजेच काय तर.असे प्रेम की ज्यात समोरच्या व्यक्तीचा दोष नसताना तिचा घात करत असते. किंवा कधी कधी जो करतोय त्याचा देखील घात होऊ शकतो.

एकतर्फी प्रेम आणि घातकता
एकतर्फी प्रेम आणि घातकता

 दहावीपर्यंतचे शिक्षण तुम्ही शाळेमध्ये घेतले,परंतु आता यापुढचे शिक्षण नुसते शिक्षण असणार नाही तर ते जीवन कॉलेज जीवन असणार आहे. या कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थी एकमेकांमध्ये मिळून-मिसळून राहायचा प्रयत्न करतात. हसत खेळत आयुष्य जगत असतात. हसता खेळता विचारांची देवाण-घेवाण देखील करत असतात.अभ्यासात एकमेकांना मदत देखील करतात;पण पुढे पु मैत्री एका वेगळ्या वळणावर जायला लागते. समोरच्याला आपल्याबद्दल काय वाटते? यापेक्षा मला तिच्या बद्दल काय वाटते?हा  विचार ज्या वेळी एखाद्याच्या डोक्यामध्ये घोंगावत राहतो आणि हीच खरी एकतर्फी प्रेमाची सुरुवात असते. 

              एकतर्फी प्रेम म्हणजे काय? तर मला माहित नाही की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. तुला मी आवडतो की नाही; पण मला तू आवडतो किंवा आवडते अशी घुसमट ज्यावेळी सुरू होते त्यावेळी ते असते ते एकतर्फी प्रेम. मग या एकतर्फी प्रेमातील भावना इतक्या विघातक होत जातात त्या कशा तर एक शायर म्हणतो,

                        गिरा अगर मेरे सपनो का महल I

                        तो तुने ही ठोकर मारी होगी I

                        या तो तू मेरी होगी I

                        या फिर खुदा को प्यार होगी I

          अशी विनाशकाले विपरीत बुद्धि ज्यावेळी मनात असते त्यावेळी ते एकतर्फी प्रेम असते. वास्तविक पाहता प्रेम हा जोर जबरदस्तीचा विषयच नाही. प्रेम ही अंतकरणातून येणारी भावना असते प्रेमात स्वार्थ हा नसतोच परंतु एकतर्फी प्रेमामध्ये मला तो हवाय? मला ती  हवीय ? ही एकेरी भावना तीव्र होऊ लागते.प्रेमात समोरच्या व्यक्तीचे सुख पाहणे अतिशय गरजेचे असते ज्यामध्ये त्याग असतो तेच खरे प्रेम असते. एक प्रेमकवी म्हणतात,

                          प्रेम मिळेना प्रेमिकाला,

                          का फिर्याद अशी खोटी,

                           प्रेम मिळेल प्रेमिकाला,

                           त्यागही प्रेमाची कसोटी.

               या कवितेच्या ओळी त्यागाचे महत्त्व सांगायला अगदी पुरून उरतात. कॉलेज विश्वामध्ये मित्र-मैत्रिणींमध्ये रमत असताना त्याग या  भावनेचे महत्व कायम लक्षात ठेवा.आपल्यामुळे कोणाचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही याचा कायम विचार करा.

                   जरा मागे वळून पाहिले की लक्षात येतेअमृता देशपांडे,रिंकू पाटील यासारख्या कित्येक तरुणींचा एक तर्फी प्रेमातून खून झालेला झाला आहे.तू  माझी नाही तर कोणाचीच नाही.म्हणून ऍसिड हल्ले,चाकू हल्ले यासारख्या घटना होताना दिसतात.हे मी तुम्हाला का सांगतोय कारण तुम्ही देखील अशा एका वळणावरती आलेला आहात आणि अगोदरच जर आपल्याला परिणाम माहीत असतील की आपल्या अशा विकृत वागण्यामुळे कुणाचे तरी जीवन नरक बनू शकते मग तुम्ही सावध व्हाल.कारण कधी कधी एखाद्या गोष्टीचे परिणाम इतके वाईट असतात हे आपल्याला माहिती नसते,कारण तेवढी समज आपल्याला आलेली नसते.आजच्या या  विशेष लेखातून एकतर्फी प्रेमातील विघातकता यामधून हीच समज देण्याचा प्रयत्न मी करत आहे.

                  वरील सर्व विवेचन ऐकल्यानंतर असं वाटत असेल या एकतर्फी प्रेमामध्ये मुलेच  मुलीपेक्षा जास्त दोषी असतातअसे काही नाही. कधीकधी मुलींकडून देखील चुका होताना दिसतात.अलीकडे पहिल्यासारख्या मुली दबून वागत नाहीत हे वास्तव आहे. अहो…………

                               ना चाहत बुरी है I

                               ना दोस्ती बुरी है I

                               बुराई तो वो है I

                              जिसकी नियत बुरी है I

                      थोडक्यात काय तर या प्रेमाच्या बाजारात आपली नीतिमत्ता साफ हवी. एक प्रांजळ नाते की जे स्त्री आणि पुरुष भेदांनाही पुरून उरेल.असं नातं की ज्या नात्यांमध्ये कोणताच भेद असणार नाही. खरंतर प्रेमात समर्पण असते. या समर्पणात वणव्यासारखे जळणे लिहिलेले असते,म्हणूनच यावर  एक कवी म्हणतात,

                            जाण्यापूर्वी वेळ,

                            प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ,

                            प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणे,

                           प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत राहणे.

               या प्रेमातील वणवा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्याग आहे. तो त्याग आज तुमच्या पिढीकडे नाही. तुमची पिढी हट्टी बनले आहे आणि अजूनच हट्टी बनणारआहे.पण या अगोदरचा काळ असा नव्हता.जाती-धर्म यांच्या चौकटीत राहून,आई वडिलांची इज्जत,समाज या बाबी नकळत दबाव आणत होत्या म्हणून याआधी प्रेम मुले मुली प्रेम करत नव्हती का?तर करत होती . एक क्षण पुरे प्रेमाचा. म्हणजेच काय तर समोरची व्यक्ती मला मिळालीच पाहिजे असा हट्ट त्यात कुठेच नव्हता. माझ्याकडे बघून कोणीतरी हसले यातच जग जिंकल्याचा आनंद होता.असे  कितीतरी प्रेमवीर मी माझ्या मित्रांच्या रूपाने पाहिलेले आहेत. की ज्यांनी त्यागातच प्रेम पाहिलं. तू माझी नाही झाली तरी चालेल पण तू सुखी पाहिजे या त्यागी भावनेने एकमेकांना अलविदा करून आज आपापल्या संसारात सुखी असणारी आमची पिढी खरंच भाग्यवान होती. आज व्हाट्सअप, इंटरनेट ,फेसबूक इंस्टाग्राम, ट्विटर यांच्या माध्यमातून माणसं नको इतकी जवळ यायला लागली आहेत. भविष्यात कधी कधी एक प्रश्न सतावतो की ही कुटुंब व्यवस्था या राक्षसापुढे टिकेल की नाही.असो हा तुमच्याशी लागू होणारा मुद्दा नाही.

                 या लेखाच्या माध्यमातून एकच सांगेन,21 शतकामध्ये थोडे संवेदनशील बनले पाहिजे. मनाकडे  समजुतदारपणा यायला पाहिजे. प्रेमासाठी कोणाचा तरी जीव घेणे कायमचे थांबले पाहिजे. ही विकृत मानसिकता आपल्यामध्ये येत असेल तर वेळीच ओळखून वेळीच सावध व्हायला पाहिजे. आणि जर का ते विघातकतेकडे आपण जात असू तर त्यासाठी वेळ प्रसंगी आपले आई-वडील, गुरुजन यांना भेटून अगदी बिनधास्तपणे आपल्या मनातील ही खदखद स्वतः सहन न करता त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतले पाहिजे.ते नक्कीच मदत करतील. आणि हाच उद्देश हा लेख लिहिन्यामागे आहे. 

                      कॉलेज विश्वात रमणाऱ्या तरुणांनी आणि तरुणीनी भोगवाद आणि स्वैराचार थांबवला पाहिजे.तरुण आणि तरुणी मध्ये मैत्रीचे नाते निर्माण केले पाहिजे. हे मैत्रीचे नाते निर्माण झाले तर एकतर्फी प्रेमातून होणारा संहार कायमचा थांबेल. एकतर्फी प्रेमाने बळी पडलेली स्त्री कोणाची तरी बहीण असेल, कोणाची तरी मुलगीअसेल. हा विचार कायम मनात असू द्या मैत्री जरूर करा. मी तर म्हणेन प्रेम देखील करा.पण ते  प्रेम एकतर्फी असू नये.खऱ्या  प्रेमामध्ये प्रचंड शक्ती असते 

                                प्रेम कर भिल्लासारखं,

                                बाणावरती खोचलेलं,

                                मातीमध्ये उगवून सुद्धा,

                               मेघापर्यंत पोहोचलेलं.

                  असं शक्तिशाली प्रेम एकमेकांना बळ देईल. जीवनात उदासीनता आली तर आनंदाने कसं जगावं? हे सांगेल.ज्यावेळी सर्वत्र अंधार असेल त्यावेळी मार्गदर्शनाचा एक किरण म्हणजे तुमची प्रिय व्यक्ती. मग ती प्रियसी असो की मैत्रीण याला फारसे महत्त्व नाही. तर महत्त्व आहे माझ्या कठीण काळात मला साथ देणार कोणीतरी आहे. आणि मित्रांनो हेच आहे खरे प्रेम किंवा खरे नाते. त्याला प्रेमच म्हणावे असा हट्ट पण नको. प्रेम म्हणजे आधार.ही भावना हवी. 

                  खरं प्रेम कसे असते. या विषयी एक हेनरी  यांची एक भाषांतरीत गोष्ट मी वाचली होती.त्या गोष्टीमध्ये एक प्रियकर आपल्या प्रेयसीच्या गळ्यामध्ये साखळी आहे पण त्या साखळीमध्ये लॉकेट नाही. म्हणून स्वतः जवळ असलेले पण  पट्टा तुटलेले घडयाळ विकून त्या प्रियशीच्या साखळीसाठी घडयाळ विकतो आणि तिकडे त्याची प्रियशी आपल्या प्रियकराच्या हातातील घड्याळाला पट्टा नाही तो घेण्यासाठी म्हणून आपल्या गळ्यातील साखळी विकते. ज्यावेळी दोघे अचानक एकमेकांसमोर येतात आणि आश्चर्यचकित होतात.खरच मित्रांनो हे आहे खरे प्रेम. ज्यामध्ये आपल्या मनापेक्षा दुसऱ्याचं मन जपणे जास्त महत्वाचे असते. ज्याने प्रेमात दुसऱ्याचे मन जपले त्याचा आनंद शब्दात सांगणे शक्य नाही.

             दहावी पास झाल्यानंतर तुमच्या कॉलेज विश्वाला सुरुवात होणार आहे आणि या कॉलेज विश्वातील मोकळेपणा आणि या मोकळेपणातून मुला-मुलींमध्ये येत असणारी जवळीकता आणि या जवळीतेतून  वाढणारी मैत्री आणि त्या पुढची पायरी म्हणजे प्रेम.आणि  त्या प्रेमाची काळी बाजू म्हणजे एक तर्फी प्रेम. हीच काळी बाजू आज मी आपल्या पुढे मांडली व ती मांडत असताना केवळ एकतर्फी प्रेम म्हणजे काय? ही चर्चा तर केलीच पण ती करत असताना प्रेमातील उदात्तता, त्याग,समोरच्या व्यक्तीचा आनंद म्हणजे प्रेम. याविषयी देखील आपल्याशी चर्चा केलेली आहे. मी तर म्हणेन हा प्रेमाचा प्रांत JR इतका कठीण असेल तर आपल्या उमेदीच्या काळामध्ये मित्र-मैत्रिणी जोडा. छान अभ्यास करा. आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न सत्यात उतरवा. हीच खरी आजच्या तरुण पिढी कडून असणारी खरी अपेक्षा आहे. असो तर एकतर्फी प्रेम किती विघातक असते. याची कल्पना तुम्हाला या  लेखातून आली असेलच. आता थोडं अभ्यासाच बोलूया. या लेखात ज्या कवींच्या रचना मी वापरल्या त्या सर्वांचे आभार.ज्यामुळे मला माझा विषय आपल्यापुढे नीट मांडता आला. 

                   जीवनामध्ये संघर्ष हा अटळ असतो.माझ्याच परिचयाचा असणारा एक माझा मित्र रणजीत. दहावीला इंग्रजी विषयात नापास होतो काय नि  पुढे जिद्दीने शिक्षण पूर्ण करून आज कंप्यूटर इंजिनियर होतो काय .आज तो एका भल्या मोठ्या पगाराची नोकरी करत आहे आणि विशेष म्हणजे इंग्रजीवर त्याची विशेष पकड आहे. असं म्हणतात ना केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे.जर कधी अभ्यास करत असताना नैराश्य आले आणि वेळ असला तर न चुकता दहावी फेल ते नोयडा हा रणजीतचा संघर्षमय प्रवास अवश्य एकदा वाचा. ज्या ज्या वेळी संकटे येतील. त्या त्या वेळी वाचा. कारण तो लेख म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते आहे एका संघर्षाचे वास्तव चित्रण. हा  लेख वाचायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा आणि हो कमेंट मध्ये आजचा हा एक तर्फी प्रेम आणि घातकता या लेखातून आपल्याला काय शिकायला मिळाले. हे कमेंट मधून नक्की कळवा धन्यवाद !

  आमचे हे लेख जरूर वाचा 

 

 

  

2 thoughts on “एकतर्फी प्रेम आणि घातकता | Ektarfi Prem Aani Ghatkata”

  1. युवकांसाठी डोळे उघडणारी पोस्ट आहे,, प्रत्येकाने ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली पाहिजे

    Reply

Leave a Comment